मालेगाव : आंध्र प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावात मोठी कारवाई केली आहे. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून परराष्ट्रातील दहशतवादी संघटना व व्यक्तींच्या संपर्कात असल्या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. हा तरुण देश विघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘यूएपीए’ अर्थात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री पोलीस गाड्यांचा ताफा अचानक शहराच्या नुमानी नगरात पोहोचल्याने नागरिकांमध्ये एकच चलबिचल सुरू झाली. तेथील गल्ली नंबर २ मध्ये वास्तव्यास असलेला तौसिफ अस्लम शेख (३०) या तरुणाच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी झडतीसत्र सुरू केले. हे झडतीसत्र नेमके कशासाठी सुरु आहे,याचा बराच वेळ, उलगडा न झाल्याने लोकांची उत्सुकता ताणली गेली होती. या कारवाईच्या दरम्यान तौसिफच्या घराजवळ बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलीस पथकाकडून घराची झडती व बराच वेळ विचारपूस केली गेल्यावर हाफिज यास येथील पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले. तेथे देखील पोलीस पथकाकडून रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली.

या कारवाईबद्दल आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील एटीएसच्या पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेला तरुण भ्रमणध्वनी आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून परराष्ट्रातील वादग्रस्त संघटना व व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहिती आंध्र प्रदेशातील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आंध्र प्रदेश व महाराष्ट्र एटीएस पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी येथील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी एस.व्ही.पिंपळे त्यांच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने आंध्र प्रदेश पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे ‘ट्रांजिट रिमांड’मंजूर केला. त्यानंतर आंध्रप्रदेश पोलीस तौसिफ याच्यासह हैदराबादकडे जाण्यासाठी रवाना झाले. त्याला पुढील सुनावणीसाठी आता हैदराबाद न्यायालयात उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाई दरम्यान पवारवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. मालेगाव आणि उत्तर प्रदेशात एकाच वेळी अशा प्रकारची कारवाई केली गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे. हाफिजचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. तो कुठलेही देश विरोधी कृत्य करू शकत नाही, असा दावा त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल हॅक झाला होता. त्या माध्यमातून काही वादग्रस्त संदेशांचे प्रसारण झाले होते आणि त्याविषयी त्याने आप्तेष्ट व ओळखीच्या व्यक्तींना अवगत केले होते,अशी माहिती त्याचे वडील असलम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पोलीस पथकाच्या चौकशीनंतर तो निष्पाप असल्याचे सिद्ध होईल,असा दावाही शेख यांनी केला आहे.