जळगाव – जिल्ह्यात विषाणूजन्य लम्पी रोगाची गेल्या महिनाभरात सुमारे १०६५ जनावरांना बाधा झाली असताना त्यापैकी ४० जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानंतर आता आजारी जनावरांच्या उपचारात हयगय करणाऱ्या पशुपालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात २३ जुलैअखेर एकूण १६६ जनावरे लम्पी रोगाने बाधित असताना त्यापैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली होती. तसेच ५० जनावरांमध्ये वेळेवर उपचार झाल्याने सुधारणा दिसून आली होती. दरम्यान, लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लसीकरणासह उपचारांवर भर दिला.
प्रत्यक्षात, त्यानंतरही २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील लम्पी बाधित जनावरांची संख्या २६५ पर्यंत पोहोचली. त्यापैकी १२ जनावरांचा मृत्यू होऊन ६३ जनावरे उपचारानंतर सुधारली. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या १०६५ इतकी असून, त्यापैकी ४० जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४६७ जनावरांवर ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लसीकरण ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी लम्पीचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
दरम्यान, काही पशुपालकांकडून लम्पीची बाधा झालेल्या आजारी जनावरांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांच्या दुर्लक्षामुळे लम्पी बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. वेळेवर उपचार न झालेली जनावरे दगावत असल्याचेही आढळले आहे.
या अनुषंगाने, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने लम्पी बाधित जनावरांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या पशुपालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने पाळीव प्राण्यांची योग्य काळजी घेतली नाही किंवा त्यांच्यावर अन्यायकारक कृत्य केल्यास त्यांच्यावर कायद्याने कारवाई करण्याची तरतूद आहे.
पशुपालकांवर होऊ शकते ही कारवाई
प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार पशुपालकांनी त्यांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास कलम ११ (एक) अंतर्गत तो दंडनीय अपराध मानला जाणार आहे. याशिवाय, महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम १९७६ च्या कलम नऊनुसार काळजी घेतली न गेलेली जनावरे विनाअनुदान जप्त केले जातील. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९१ आणि ३२५ अंतर्गत लम्पीची लागण झालेल्या जनावरांची काळजी न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यास पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. ज्यामध्ये कैदेची तसेच दंडाची तरतूद आहे. पशुधन विकास अधिकारी पशुपालकांना लेखी औषधोपचाराचा कागद देतील. त्याचे सर्व पशुपालकांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय, पशुपालकांनी गोठ्यातील जनावरांची वेळोवेळी तपासणी करून लम्पीची बाधा झाल्यास त्वरीत उपचार करून घ्यावे, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.