जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक करत एक लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम लंपास करण्यात आला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील प्रकाश गोसावी यांच्या शेतात ३५ वर्षाचा युवक आला. आपण जिओ कंपनीतून आलो असून शेताच्या आवारात मनोरा उभा करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगितले. यासाठी १८ हजार रुपये भाडे आणि घरातील एका व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून कंपनीला कामाला लावून देतो. त्याला १२ हजार रुपये देण्यात येतील, असे आमिष दाखवले. मधल्या काळात एक ते दोन वेळा संपर्क केला. एका क्रमांकावरून फोन पेच्या माध्यमातून १० हजार रुपये उकळले. उंबरकोण फाट्यावर साई परिवार हॉटेलजवळ पुढील चर्चेसाठी बोलावले. पेट्रोल पंप परिसरातील स्वच्छतागृहात जावून येतो असे सांगत गोसावी यांची एक लाख रुपयांची मोटारसायकल नेली. संशयिताने मोटारसायकल आणि १० हजार रुपये असा एक लाख, १० हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचा >>>“काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, पक्षश्रेष्ठींना…”; सत्यजीत तांबेंबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान

दुसऱ्या घटनेत बाळू बोरसे (६५, रा. मालेगाव) हे त्यांच्या पत्नीसमवेत मालेगाव येथे युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेत गेले. एटीएम कार्डचा वापर करुन दोन हजार रुपये काढले. त्यांच्या मागे असलेल्या संशयिताने एटीएम पीन बघून घेत हातचलाखीने एटीएम कार्ड बदलत संशयिताने वेगवेगळ्या ठिकाणाहून बोरसे यांच्या संमतीशिवाय ७५ हजार रुपये काढले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.