नाशिक : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महिलावर्गाची जोरदार गर्दी खेचत असणाऱ्या केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाने नाशिक शहरातही धु्माकूळ घातला आहे. शहरातील पाचही मल्टिप्लेक्समध्ये केवळ बाईपण भारी देवा याच चित्रपटाचा बोलबाला असून मल्टिप्लेक्सच्या आवारात सध्या केवळ महिलांचीच गर्दी दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या यशामुळे या चित्रपटाबरोबर प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट झाकोळले गेले असून कित्येक दिवसांनी एकाच मराठी चित्रपटाचे दिवसातून वीस शो दाखविण्याची वेळ सिटी सेंटर माॅलमधील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्सवर आली आहे. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, अशी ओरड एकिकडे काही निर्माते, दिग्दर्शकांकडून केली जात असताना सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिवसातून दहापेक्षा अधिक शो नाशिकमधील विविध मल्टिप्लेक्समध्ये दाखविले जात आहेत. सहा बहिणींची कथा रंजकपणे विणलेल्या या चित्रपटाने महिलांवर अक्षरश: जादू केली आहे. महिलांमध्ये सध्या केवळ या एकाच चित्रपटाची चर्चा होत आहे. 

हेही वाचा >>> रेल्वेत नोकरीच्या आमिषातून सात तरुणांची फसवणूक; भुसावळच्या एकाविरुद्ध गुन्हा

वेगवेगळी महिला मंडळे, हौसिंग सोसायटीतील महिला, भजनी मंडळ, भिशी ग्रुप, मंगळागौर ग्रुप, एखाद्या काॅलनीतील महिला याप्रमाणे एकाचवेळी गटागटाने महिला या चित्रपटासाठी गर्दी करीत असल्याने मल्टिप्लेक्सचे आवार सध्या केवळ महिलांनी भरलेले दिसत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट पाहण्यासाठी महिलावर्ग नटूनथटून येत असून काही गट तर या चित्रपटातील सहा बहिणींप्रमाणे गाॅगल घालून चित्रपटाच्या फलकासोबत सेल्फीही काढत आहेत. केवळ ज्येष्ठच नव्हे तर, युवतींचीही या चित्रपटाला गर्दी होत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : ‘कलंक’वरून राज्यात घमासान, भाजपाच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

सध्या सिनेमॅक्स (सिटी सेंटर माॅल) २०, रेजिमेंटल सिनेमॅक्स प्लाझा १०, दिव्या सिनेमाज १४, आयनाॅक्स सिनेमाज १४, मुव्हीमॅक्स द झोन १२ याप्रमाणे बाईपण भारी देवाचे शो दाखविले जात आहेत. कित्येक दिवसानंतर एकाच मराठी चित्रपटाचे इतके शो एकाच दिवशी दाखविण्याची वेळ मल्टिप्लेक्सगृहांवर आली आहे. अवघ्या आठवडाभरात या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात १२ कोटीहून अधिक कमाई केल्याचे सांगण्यात येत असून वेड या चित्रपटानंतर या वर्षातील हा दुसरा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

हेही वाचा >>> जळगावात महावितरण तंत्रज्ञांचे आंदोलन सुरुच; बदल्यांप्रश्‍नी कार्यकारी अभियंत्यांशी बोलणी फिस्कटली 

चित्रपटातील सहा बहिणींची कथा मनाला खूपच भावणारी आहे. काही प्रसंगात डोळ्यात आसू आणि काही वेळा हासू आणणारा हा चित्रपट खूपच आवडला. आमच्या काॅलनीतील महिला मंडळातील वीस सदस्यांनी एकाचवेळी हा चित्रपट पाहिला. – मृणालिनी देशपांडे ( गायत्री विहार, अमृतधाम)

चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे सध्या बंदच केले होते. परंतु, कार्यालयातील सर्व महिला बाईपण भारी देवाचे गुणगान गाऊ लागल्याने उत्सुकता वाढली. तीन ते चार वर्षानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. भावनाप्रधान असा हा चित्रपट मनोरंजक पध्दतीने मराठी संस्कृती आणि आधुनिकता यांचा मेळ घालण्यात यशस्वी झाला आहे. – अनुराधा पाटील (उपनगर, नाशिकरोड)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva movie women of nashik time to show 20 shows a day on multiplexes ysh