प्राणवायूचे आश्वासन पाळल्याचा भाजपचा दावा, भाजपची चमकोगिरी असल्याची शिवसेना-राष्ट्रवादीची टीका

नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच जुंपली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्राणवायूबाबत दिलेले आश्वासन मंगळवारी पूर्णत्वास नेल्याकडे भाजपने लक्ष वेधले आहे. पहिला टँकर शहरात दाखल झाला असून त्यातून १९ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाला. प्रत्येक आठवडय़ाला दोन असे महिनाभरात आठ टँकर प्राणवायू मिळणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

गेल्या शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शहराचा दौरा केला होता. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेत अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या रुग्णालयासह बिटको रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. वाढत्या करोना रुग्णांमुळे प्राणवायूचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा असल्याचे लक्षात घेऊन गुजरातमधील दोन उद्योगांकडून दर आठवडय़ाला दोन अतिरिक्त टँकर शहराला उपलब्ध करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्या अनुषंगाने उपरोक्त उद्योग आणि प्रशासकीय अधिकारी यांची चर्चा करवून दिली. फडणवीस यांच्या सूचनेनंतर बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणाही कार्यान्वित झाली. विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादीत परस्परांवर आगपाखड सुरू असताना मंगळवारी सकाळी प्राणवायूचा अतिरिक्त टँकर शहरात दाखल झाला. आणि या लढाईला वेगळे वळण मिळाले. सकाळी साडेसहा वाजता आलेल्या टँकरचे महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींनी स्वागत केले. फडणवीस यांनी दिलेला शब्द तंतोतंत खरा करून दाखविल्याचा दावा महापौरांनी केला. पहिल्या टँकरमधून १९ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाला. त्यातील आठ मेट्रिक टन जिल्हा शासकीय रुग्णालय तर उर्वरित प्राणवायू पुरवठादारांना देण्यात आला. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी नाशिककरांना वाऱ्यावर सोडून दिले. रेमडेसिविर, प्राणवायू ते देऊ शकले नसल्याचा आरोप करत कुलकर्णी यांनी सेना-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. रेमडेसिविरसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आंदोलन के ल्यानंतर कुठे परिस्थितीत सुधारणा झाली.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अजूनही जाग नाही

नाशिककरांना कधी व्हेंटिलेटर तर कधी खाट तर कधी रेमडेसिविरसाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. या स्थितीला वर्ष उलटून गेले तरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जाग आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले होते. सर्वत्र टाकेची झोड उठल्यानंतर नाइलाजास्तव त्यांना नाशिकला भेट द्यावी लागली. महामारीच्या काळात चमकोगिरी करणाऱ्यांनी आम्हाला समाजसेवा शिकवू नये, अशी टीका महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी के ली आहे. फडणवीस यांच्या भेटीवेळी बिटको रुग्णालयात नाशिककरांचा संताप पाहिल्यावर भाजपच्या नेत्यांना काढता पाय घ्यावा लागल्याचे सर्वज्ञात आहे. महामारीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री चमकोगिरी करण्यापेक्षा सामान्यांना आरोग्य सुविधा कशा पुरवता येतील, यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा उभयतांनी केला. शिवसेना करोना काळजी केंद्र, प्राणवायू कॉन्स्ट्रेटर, रक्तदान, रक्तद्रव आदी माध्यमातून रुग्णांना सेवा देत आहे. रस्त्यावर सेनेच्या रुग्णवाहिका दिसतात. शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करतात. स्टंटबाजी करीत नाही, असा टोला बोरस्ते यांनी भाजपला लगावला आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आलेल्या प्राणवायू टँकरचे स्वागत करताना महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे आणि भाजपचे पदाधिकारी.