पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा आरोप असणाऱ्या नगरसेवक पवन पवारला प्रवेश दिल्यावरून भाजपमध्ये स्थानिक पातळीवर निर्माण झालेली अस्वस्थता औट घटकेची ठरली आहे. या प्रवेशाला आक्षेप घेणाऱ्या गटाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या सुसंवाद मेळाव्यात हा विषय मांडण्याऐवजी मौन बाळगणे पसंत केले. संबंधित बाहुबलीचा दबदबा असणाऱ्या नाशिकरोड भागातील पोट निवडणुकीत विजय मिळाल्याने त्याला प्रवेश देण्यास पुढाकार घेणाऱ्या गटाने पक्षांतर्गत विरोध मोडून काढल्याचे अधोरेखित झाले आहे.
नाशिकरोड प्रभागातील पोट निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळविला. तत्पुर्वी, म्हणजे प्रचारादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या भागातील अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश दिला. हा प्रवेश पक्षांतर्गत मतभेद उफाळून येण्याचे कारण ठरला. पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पवारला प्रवेश दिल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असे एका गटाचे म्हणणे होते. सर्वाना अंधारात ठेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा उद्योग केल्याची तक्रार संबंधितांनी थेट प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत केली होती. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तीला प्रवेश दिल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेनेही भाजपवर टिकास्त्र सोडले. पक्षांतर्गत व विरोधकांकडून टीकेचा प्रचंड भडिमार झालेल्या या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्यात काही निर्णय होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. तथापि, ती फोल ठरली. पोट निवडणुकीत विजय मिळाल्याने पवारला प्रवेश देण्यात कळीची भूमिका निभावणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत विरोधाला धूप घातली नाही. किंबहुना त्यांच्या निर्णयाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा असल्याची भावना तक्रार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीत स्वबळावर यश मिळविण्यासाठी मेळाव्यात मंथन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेले मार्गदर्शन तक्रारी करणाऱ्यांचे कान टोचणारे ठरले. पक्ष सत्तेत असला की, इतर पक्षातून लोक आपल्या पक्षात येतात. मन मोठे केल्यास पक्ष मोठा होईल. महापालिका निवडणुकीसाठी ‘आपला-परका’ हा भेद विसरून सर्वानी एकाच बसमध्ये बसावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. भाजपमध्ये नव्याने येणाऱ्यांना विरोध करणाऱ्या गटाला उद्देशून त्यांनी हे विधान केल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे. १२० पैकी ११० जागा जिंकून भाजपचा महापौर करण्यासाठी गाफील न राहता सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मेळाव्यात बहुचर्चित पवार प्रवेशाबाबत काही निर्णय तर दूर पण साधी चर्चादेखील झाली नाही. सर्वाना भाजपमध्ये सामावून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे वरिष्ठांकडे तक्रार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय काढण्याचे धाडस दाखविले नाही. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या पवारला वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय पक्षात प्रवेश मिळणे अवघड आहे. त्याला सहजपणे प्रवेश मिळाल्याने आणि सर्वाना सामावून घेण्याचे पक्षाचे धोरण निश्चित झाल्याने या गटाची ‘तोंड दाबून गुद्यांचा मार’ अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे.
भाजप सरकार आणि पक्षाच्या भूमिकेत विसंगती ?
पोलीस कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर, राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपची सरकार म्हणून एक आणि पक्ष म्हणून वेगळीच भूमिका असल्याचे दिसत आहे. आढावा बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवरील हल्ला कदापि सहन केला जाणार नसल्याचे सांगून या स्वरुपाचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. एखाद्या कर्मचाऱ्यावरील हल्ला संपूर्ण पोलीस दलावरील हल्ला मानला जाईल, असे त्यांनी सूचित केले. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या सुरक्षितेतबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे पक्षीय पातळीवर त्या विपरित भूमिका घेतली गेल्याची स्थिती आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवकाला भाजपने पक्षात प्रवेश दिला. या स्वरुपाचे हल्ले करणारे गुन्हेगार सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाला जाणार असतील तर संबंधितांविरुध्द कारवाई कशी होणार आणि पोलिसांचे संरक्षण कसे करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.