शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात काही अपवादवगळता अंतर्धान पावलेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर मात्र रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा होत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे राजकीय पक्ष हा आपल्या पाठपुराव्याचा विजय असल्याचा दावा करीत आहे. त्यात भाजपने उडी घेत हे श्रेय कोणी लाटणार नाही, असा प्रयत्न सुरू  आहे.

निर्णय जाहीर झाल्यानंतर किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. काँग्रेस व राष्ट्रवादीदेखील विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे हा निर्णय घेणे भाग पडल्याचा दावा करीत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने नाशिक येथे कृषी अधिवेशनाचे आयोजन करत राज्यातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय सेनेचेही असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. राजकीय पटलावरील घडामोडी लक्षात घेऊन मनमाड भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी केल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.  या ऐतिहासिक कर्जमाफीचे श्रेय हे भाजप नेतृत्वाचे असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. एकात्मता चौकात फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली.

नांदगाव येथील वयोवृद्ध शेतकरी शिवाजी शेरेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून कर्जमाफीचा लाभ भाजपचे कार्यकर्ते तळागाळातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेतकरी आंदोलन काळात भाजपचे पदाधिकारी कुठेही दृष्टिपथास पडले नसल्याची तक्रार आधीच विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

निर्णयाचे श्रेय इतरांना मिळू न देण्यासाठी भाजपची दक्षता

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा नाशिक हे केंद्रबिंदू ठरले होते. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने केली. परिणामी, जिल्ह्यतील बाजार समित्यांचे लिलाव पूर्णपणे ठप्प झाले.  याच कालावधीत येथे आयोजित किसान परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात आली. या घडामोडींची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समितीशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांपाठोपाठ  वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे राजकीय पक्ष हा आपल्या पाठपुराव्याचा विजय असल्याचा दावा करीत आहे. श्रेय घेण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. या कोलाहलात निर्णय घेणारा पक्ष मागे राहू नये याची दक्षता भाजप घेत आहे. कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय मित्रपक्ष वा विरोधकांना मिळू नये, यासाठी भाजप पध्दतशीरपणे प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.