मालेगाव : शहरातील ५०० कोटींचे भुयारी गटाराचे काम करणाऱ्या गुजरातच्या अंकिता कन्स्ट्रक्शन या कंपनीला येथील महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकाने चांगलाच दणका दिला आहे. भुयारी गटाराच्या कामासाठी अवैध वाळूचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने या कंपनी विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुका परिसरात गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. म्हाळदे शिवारातील ११ हजार घरकुल योजनेच्या जागेत मातीचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाल्याने तेथे मोठमोठाली खड्डे पडली आहेत. या अवैध उत्खननाबद्दल महसूल प्रशासनाने महापालिकेला जबाबदार धरले आहे. तसेच त्याबद्दल ५ कोटी ४७ लाखांचा दंड का आकारण्यात येऊ नये, अशी नोटीस महापालिकेला बजावण्यात आली. दुसऱ्या बाजूला गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांना महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच राजकीय आशीर्वाद मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मालेगावच्या अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकांनी बुधवारी अवैध पद्धतीने गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई केली. या कारवाईत मुंबई-आग्रा महामार्गावर अंबिका हॉटेल जवळ एका ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ट्रॅक्टर चालकाकडे विचारणा केल्यावर शहरात भुयारी गटाराचे काम करणाऱ्या अंकिता कन्स्ट्रक्शन या कंपनीचे हे ट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना देखील आढळून आला नाही. त्यामुळे वाळूची चोरी व अवैध पद्धतीने वाहतूक होत असल्याचा ठपका ठेवत  कंपनीच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

अंकिता कन्स्ट्रक्शन ही गुजरातमधील बडी मक्तेदार कंपनी आहे. शहरातील ५०० कोटी खर्चाच्या भुयारी गटाराचे काम प्राप्त करण्यासाठी अन्य बड्या कंपन्या उत्सुक होत्या. मात्र त्यासाठी झालेल्या स्पर्धेत सर्वांवर मात करत या कंपनीने हे काम पदरात पाडून घेतले. त्यामुळे अन्य इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला होता. दरम्यान,एवढ्या मोठ्या कंपनीकडून वाळूची चोरी करुन गटाराचे काम उरकले जात असल्याचे निदर्शनास आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याशिवाय आणखी दोन वाहनांवर पथकाने कारवाई केली आहे.  सायने शिवारात एका ट्रॅक्टरमधून अवैध पद्धतीने खडीची वाहतूक होत असल्याचे पथकाला आढळून आले. हे ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करत सुनील बच्छाव याच्या विरोधात याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या जवळील रस्त्यावर एका डंपरमधून मुरूमची अवैध वाहतूक होत असल्याचे पथकाला आढळून आले. हे डंपर जप्त करून कॅम्प पोलीस ठाण्यात अविश नावाच्या व्यक्ती विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या या तिन्ही वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे.