नाशिक – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. ॲमेझॉन सहायता सेवेचे कॉल सेंटर असल्याचे भासवत संशयितांनी येथून परदेशात फसवे फोन केले. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

इगतपुरीतील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे भाडेतत्वावरील जागेत संशयितांकडून बेकायदेशीर कॉल सेटर चालविण्यात येत होते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कारवाईतून ते उदध्वस्त झाले. या प्रकरणी मुंबईतील सहा जणांसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी, सोने, अलिशान मोटार आणि रोकड, क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली. इगतपुरीस्थित हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालविण्यासाठी संशयितांनी दूरध्वनी चालक, पडताळणीधारक आणि समाप्तीधारक या तीन पदांवर ६० जणांची नियुक्ती केली होती.

सीबीआयच्या पथकाने कॉल सेंटरमध्ये छापा टाकला असता कार्यरत ६२ कर्मचारी कॉल सेंटरचे प्रत्यक्ष संचालन करत होते. परदेशी नागरिकांची फसवणूक करताना आढळल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आ्हे. या कारवाईने इगतपुरीतील रिसॉर्टमधील अवैध उद्योग पुन्हा उघड झाले आहेत. या भागातील विविध रिसाॅर्ट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले आहेत. या कारवाईने परदेशातील नागरिकांच्या फसवणुकीचे केंद्रही या भागात असल्यावर प्रकाश पडला.

सव्वा कोटींची रोकड, आभासी चलन जप्त

तपासात ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी, आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. सव्वा कोटींची बेहिशेबी रोकड, ५०० ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपयांच्या सात अलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या. अंदाजे पाच लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी आणि दोन हजार कॅनेडियन डॉलर किंमतीचे भेटवस्तू प्रमाणपत्राचे (गिफ्ट व्हाऊचर) व्यवहार आढळून आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

भेटवस्तू प्रमाणपत्र, क्रिप्टोकरन्सीने फसवणूक

फसवे फोन करुन संशयितांनी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक केली. भेटवस्तू प्रमाणपत्र, आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक करुन संशयितांनी पैसे मिळवले. घटनास्थळावरून त्यास पुष्टी देणारी सामग्री हस्तगत करण्यात आली. संशयितांनी संगमनताने अन्य व्यक्तींना हाताशी धरून गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचला आणि ॲमेझॉन सहायता सेवेचे कॉल सेंटर असल्याचे भासवले. या सेंटरमधून फोन करून तोतयागिरी करीत आर्थिक फसवणूक केल्याचे सीबीआयने तक्रारीत म्हटले आहे.