अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जितका धोका, तितका नफा’ या तत्वावर हंगामपूर्व द्राक्षांचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांच्या प्रयत्नांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. निर्यातक्षम द्राक्ष जगाच्या बाजारात पाठविणाऱ्या बागलाण, देवळा, मालेगाव भागातील उत्पाद्र आता उत्पादनातील धोका कमी करण्याचा गांभिर्यपूर्वक विचार करत आहेत. छाटणीनंतर द्राक्ष तयार होण्यास साधारणत: ११० ते १२० दिवस म्हणजे चार महिने लागतात. दरवर्षी जून, जुलै महिन्यात केली जाणारी छाटणी पुढील हंगामापासून महिनाभर पुढे ढकलण्याचे मोठय़ा बागाईतदारांनी ठरविले आहे.

हंगामपूर्व द्राक्ष उत्पादन करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची द्राक्ष नोव्हेंबरमध्ये काढणीस येतात. या काळात एक-दोन पाऊस झाले तरी बागा त्या सहन करू शकतात. तयार द्राक्ष लगेच खराब होत नाहीत. यंदा मात्र ४० ते ६० मिलीमीटर पाऊस सातत्याने पडला. बागलाण, देवळा, मालेगाव भागातील द्राक्षांचे कोटय़वधींचे नुकसान होण्यामागे हे मुख्य कारण आहे. जिल्ह्य़ात सुमारे ७० हजार हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत. द्राक्षाचे उत्पादन कधी हाती येईल, हे बागांच्या छाटणीवर निश्चित होते.

कसमादे भागात छाटणी लवकर म्हणजे मुख्यत्वे जून, जुलैमध्ये केली जाते. निफाड, नाशिक, दिंडोरी, सिन्नर आदी परिसरात त्यापेक्षा उशिरा म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये छाटणी होते. कसमादे भागात द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरण्यास कमी कालावधी लागतो. कारण, तेव्हा दिवस मोठा आणि रात्र लहान असते. आवश्यक तेवढे ऊन कमी काळात मिळून द्राक्षमण्यात साखर उतरते, असे उत्पादक सांगतात. परिसरात साधारणत: ११० दिवसांत द्राक्ष तयार होतात. ऑक्टोबरच्या मध्यानंतर ती बाजारात येऊ लागतात. डिसेंबपर्यंत हा हंगाम चालतो. तेव्हां जगात कुठल्याही भागात द्राक्ष नसतात. स्पर्धा नसते. यामुळे उत्पादकांना चांगले दर सहज मिळतात.

नाताळात जगभरात द्राक्ष पुरविणारा हा एकमेव परिसर आहे. रशिया, युरोप, बांग्लादेश, मलेशिया, चीन आदी देशात द्राक्ष निर्यात होतात. यंदाच्या हंगामात द्राक्षांना ७० ते १५० रुपये किलो दर मिळणार होता. तसे सौदे व्यापाऱ्यांशी झाले होते. अखेरच्या टप्प्यात पावसाने उत्पादकांचे गणित विस्कटले.

हंगामपूर्व द्राक्ष उत्पादनात नफा जितका अधिक, तितकाच धोका असतो. धोका पत्करून उत्पादन घेतले जाते. नैसर्गिक आपत्तीचे सावट घोंघावत असते.

हे संकट टळल्यास लक्षणीय नफा ठरलेला असतो. अर्ली द्राक्षांसाठी विमा योजना नाही. यामुळे नुकसान झाले तरी भरपाई मिळत नाही. बदलत्या पाऊसमानाचा धोका टाळण्यासाठी उत्पाद्र वेगळा विचार करत आहे. द्राक्ष तयार होण्याच्या काळात पावसाचा फटका बसू नये म्हणून छाटणीचे वेळापत्रक बदलविले जाणार आहे. एरवी, मे, जूनमध्ये होणारी छाटणी महिनाभर पुढे ढकलल्यास द्राक्ष यंदासारखी पावसाच्या कचाटय़ात सापडणार नाहीत, या निष्कर्षांप्रत उत्पादक आले आहेत. पुढील हंगामापासून त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. बागलाण परिसरात २० ते १०० एकपर्यंत द्राक्ष बागा असलेले बागाईतदार आहेत. त्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

गतवर्षी १०० एकर द्राक्ष बागेतून सुमारे पाच ते सहा कोटी रुपये उत्पन्न मिळाले. जवळपास ६०० टन द्राक्ष उत्पादित झाली होती. त्यास ६० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळाले. बागेवरील वार्षिक खर्च तीन ते चार कोटी रुपये आहे. सर्व खर्च वजा जाता एक ते दीड कोटी रुपये मिळतात. सततच्या पावसाने यंदा द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. डोक्यावर कोटय़वधींचे पीक कर्ज आहे. शासकीय मदत दिली नाही तरी चालू पीक कर्ज माफ व्हायला हवे. पुढील हंगामात द्राक्ष पावसात सापडू नये म्हणून बागांच्या छाटणीचे वेळापत्रक महिनाभर पुढे ढकलले जाईल. आतापर्यंत आम्ही एक ते १५ जुलै या कालावधीत बागांची छाटणी करायचो. आता ती ऑगस्टमध्ये केली जाईल. असे केल्याने डिसेंबरच्या सुरूवातीपासून माल बाजारात येईल.

– कृष्णा भामरे (धर्मराज फार्म, पिंगळवाडे, सटाणा)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes to the grapes yard pruning schedule abn