नाशिक -सिन्नर शहरासह तालुक्यात रविवारी झालेल्या वादळी पावसात सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग शिवशाही बसवर कोसळल्यानंतर सोमवारी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने स्थानकाच्या स्वच्छतेचे काम दिवसभर करण्यात आले. या कामामुळे प्रवासी वाहतूक स्थानकाच्या अन्य भागातून करणे भाग पडले.

सिन्नर परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन तास वादळी पाऊस झाला. या पावसात सिन्नर बस स्थानकाचा मागील भाग कोसळला. या ठिकाणी उभ्या असलेल्या शिवशाहीचे त्यामुळे मोठे नुकसान झाले. स्थानकाचे छत तसेच दर्शनी भाग कोसळल्याने ठिकठिकाणी मातीचा ढिगारा तसेच अन्य सामान अस्ताव्यस्त पसरले. यामुळे काही काळासाठी स्थानकातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. २०१३ मध्ये आमदार माणिक कोकाटे यांनी बीओटी तत्वावर बस स्थानकाचा कायापालट केला होता. .यानंतर हे बस स्थानक राज्य परिवहन महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आले. सिन्नर बस स्थानकाप्रमाणे नाशिकमधील ठक्कर बाजार बस स्थानकाचे कामही बीओटी तत्वावर करण्यात आले आहे.

याविषयी विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी माहिती दिली. सिन्नर येथील बस स्थानकाच्या नुकसानीविषयी महामंडळाचा स्थापत्य विभाग हा बांधकाम परीक्षण करीत आहे. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्थानकात नुकसान झालेल्या भागाची दुरूस्ती करण्यात येत आहे. स्थानकात माती, सिमेंट, विटांचा ढीग आहे. बस स्थानकाच्या अन्य भागातून प्रवासी वाहतूक सुरू राहिली. बस स्थानकाच्या स्वच्छतेचे काम सोमवारी करण्यात आले. स्वच्छतेनंतर नुकसान झालेल्यापैकी काही भाग प्रवासी वाहतुकीसाठी खुला होईल, असे भोसले यांनी सांगितले.