जळगाव – जिल्ह्यात ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात तसेच गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत निवडक ३०० गावांमध्ये एकाच दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

समृद्ध ग्रामपंचायत अभियानातून स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेची औपचारिक सुरूवात धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्वच्छतेचा वार सोमवार, अशी संकल्पना राबवून प्रत्येक सोमवारी गावात यापुढे नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये एकत्रित स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छतेबरोबरच एक पेड माँ के नाम, या विशेष उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबर मातृस्मरणही साधले गेले. दरम्यान, समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवितानाच लोकाभिमुख व पारदर्शक ग्राम प्रशासन, ग्रामपंचायतींच्या संकेतस्थळांसह कार्यालयीन दप्तर व नोंदवही तसेच अपंग आणि विशेष घटकांची माहिती अद्ययावतीकरण, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार, ग्रामसभांचे प्रभावी आयोजन,  ग्रामपंचायत स्तरावरील तक्रार निवारण, असे बरेच उपक्रम आगामी काळात प्रभावीपणे राबवविले जाणार असल्याचे सांगण्यात आले