comrade kumar shiralkar passed away after long illness at nashik zws 70 | Loksatta

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर कालवश

राज्यात शेतमजूर, शोषित, श्रमिक, दलित यांच्या उत्थानासाठी त्यांनी सामाजिक चळवळीत वाहून घेतले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर कालवश

नाशिक : आदिवासी, शेतमजूर यांना न्याय मिळावा यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने नाशिक येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. 

कॉम्रेड शिराळकर काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. माकप कार्यकर्त्यांच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे मिरजेचे असणारे शिराळकर यांनी पवई आयआयटीतून सुवर्णपदक मिळविले होते. मार्क्‍सवादाने ते प्रभावित होते. मुंबईत असताना युवक क्रांती दलात त्यांचा सहभाग होता. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अंबरसिंह महाराजांच्या संपर्कात येऊन ते माकपशी जोडले गेले. मार्क्‍सवाद केवळ वाचनापुरताच मर्यादित न ठेवता त्यांनी तो कृतीत आणला. २०१४ पर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली माकपचे शिष्टमंडळ चीनला गेले होते. त्यात शिराळकर यांचा समावेश होता.

राज्यात शेतमजूर, शोषित, श्रमिक, दलित यांच्या उत्थानासाठी त्यांनी सामाजिक चळवळीत वाहून घेतले. या समाज घटकांशी संबंधित अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. ‘उठ वेडय़ा, तोड बेडय़ा’ ही त्यांची पुस्तिका विशेष गाजली. जातीअंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती आणि ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मीमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्माधतेचे राजकारण आदी विषयांवर शिराळकर यांनी लेखन केले. पुण्यातून चालणाऱ्या मागोवा गटाचे ते सदस्य होते. धुळे जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर यांच्यावरील शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठविला. आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. बरीच वर्षे ते नंदुरबार, धुळय़ात कार्यरत होते. त्यामुळे या जिल्ह्यातील आदिवासींमध्ये ते कुमारभाऊ म्हणून ओळखले जात. याच जिल्ह्यातील मोड गावी सोमवारी दुपारी चार वाजता शिराळकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

कार्यकर्ता लेखक..लोकचळवळींना प्रेरणा देणारे लेखक म्हणूनही कुमार शिराळकर परिचीत होते. ‘ऊठ वेडय़ा, तोड बेडय़ा’ हे त्यांचे पुस्तक अनेक कार्यकर्त्यांना घडवणारे ठरले. ऊसतोड मजूर, पाणीवाटप, ग्रामीण रोजगार आणि बेरोजगारी हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. बाबा आमटे यांच्याशी त्यांचे राजकीय विचार कधी जुळले नसले तरी कार्यप्रेरक म्हणून आमटे यांच्याबद्दल त्यांना आदर होता. अलीकडेच, ‘नवे जग, नवी तगमग’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक प्रकाशित झाले. ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाखेरीज, साधना, इकॅानॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली अशा साप्ताहिकांतूनही त्यांनी लेखन केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवीन पोलीस ठाण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा ; सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय

संबंधित बातम्या

जळगाव : शेतशिवारामधून अडीच लाखांची कापूसचोरी
लसीकरण होऊनही लम्पीच्या प्रादुर्भावाचे सावट; नाशिक जिल्ह्यात ९९ टक्के लसीकरण पूर्ण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार