नाशिक : श्रीलंकेतील सहलीचे आमिष दाखवून ट्रॅव्हल कंपनीच्या महिलेने सुमारे ८० लाखांस गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संजित बेझलवार यांनी तक्रार दाखल केली आहे. बेझलवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने श्रीलंकेत फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला होता. या अनुषंगाने त्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये कॉलेजरोड परिसरातील दातार ट्रॅव्हल्स अॅण्ड कन्सल्टन्सी या प्रवासी कंपनीशी संपर्क साधला. उपस्थित महिलेने बेझलवार यांच्यासह अन्य साक्षीदारांचे सहलीचे नियोजन करून प्रवास खर्चासह तब्बल ७९ लाख ५० हजार १०० रोकड जमा केली. काही दिवसांत सहल जाणार असल्याने सर्व पर्यटक तयारीला लागले. परंतु, कोणतीही सुविधा न देता संबंधित कार्यालय आणि संपर्क बंद करून आमची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरकडे खंडणीची मागणी
शासकीय ठेकेदार असलेल्या डॉक्टरकडे दोघांनी खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज शर्मा (शिंगाडा तलाव) यांनी तक्रार दिली. शर्मा इलेक्ट्रो होमिओपॅथी डॉक्टर असून ते शासकीय ठेकेदारीचा व्यवसाय करतात.
आपल्या कार्यालयाकडे ते जात असताना सिल्व्हर ओक शाळा परिसरात चिराग बनकर या संशयिताने त्यांचे वाहन अडविले. या वेळी त्याने दमबाजी करीत खंडणीची मागणी केली. शर्मा यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी शर्मा यांचे शिंगाडा तलाव येथील कार्यालय परिसरात दहशत माजविण्यासाठी आरडाओरड करीत रहिवाशांच्या घरावर दगडफेक केली.
या वेळी शर्मा यांच्या कार्यालयासमोर उभी केलेली रोहित शहा यांच्या मोटारीची काच फोडण्यात आली या प्रकरणी चिराग बनकर (२६, जुना आडगावनाका) आणि जॉर्ज साळवे (२९, शरणपूररोड) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीची बदनामी करणाऱ्यास अटक
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणीचे छायाचित्र टाकून बदनामी करणाऱ्या संगमनेर येथील तरुणास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक उकिरडे (२७, संगमनेर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. परिचित युवतीचे समाजमाध्यमात बनावट खाते तयार करून संशयिताने छायाचित्र टाकले. इन्स्टाग्राम खात्यावरही तसेच केले. हे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.