नाशिक – एअरपाझ नोंदणीचे मानांकन (रेटींग) दिल्यानंतर चांगली दलाली मिळते. तसेच भाग आणि आयपीओ खरेदीत दलाली मिळत असल्याचे भासवत सायबर गुन्हेगारांनी शहरातील तीन जणांना सुमारे ३७ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जलीस कुरेशी यांनी तक्रार दिली. २२ फेब्रुवारी ते १७ मे या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित निशा अग्रवाल नामक अनोळखी खात्यातून टेलिग्रामवरून लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत असे. टेलिग्रामवरील एअरपाझ वर्किंग गटात संबंधितांना समाविष्ट करून उद्दिष्टाविषयी माहिती दिली गेली. व्हॉट्सॲप फोनद्वारे संपर्क साधला जात असे. या ॲपद्वारे मानांकन दिल्यास चांगली दलाली मिळत असल्याचे भासवत संशयितांनी विविध बँकेच्या खात्यावर २३ लाख ८७ हजार रुपये भरण्यास भाग पाडून तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केली.

दुसऱ्या घटनेत संशयितांनी तक्रारदार साक्षी वाघ यांचे पती विजय वाघ यांना एक्सेंज ग्रुप या टेलिग्राम गटात समाविष्ट केले. आयपीओ आणि भाग खरेदी करण्यास सांगून वेळोवेळी एकूण सात लाख २२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तक्रारदार सचिन गवांदे यांना ब्लिंकएक्स फॉर्च्युन नेव्हीगेटर या अनोळखी व्हॉट्स ॲप वरून संदेश करत भाग आणि आयपीओ खरेदीत दलाली मिळत असल्याचे भासवत विविध बँक खात्यांवर पाच लाख ८० हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडले.

या प्रकारांमध्ये तक्रारदारांची ३६ लाख ९० हजार ४३४ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फसवणुकीसाठी वापरलेले व्हॉट्सॲप व टेलिग्रामधारकांसह ज्या खात्यांमध्ये हे पैसे वर्ग झाले ते बँक व वॉलेटधारकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.