नाशिक : सलग दोन दिवस जिल्ह्यातील काही भागांत पावसाने अक्षरश: दाणादाण उडवल्यानंतर शुक्रवारचा दिवस ऑक्टोबर हिटसारखे उन्हाचे चटके देणारा ठरला. एकाच वेळी मुसळधार पाऊस आणि टळटळीत उन्हाचे चटके अशा दुहेरी वातावरणाची सध्या अनुभूती मिळत आहे. आदल्या दिवशी सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

सिन्नर शहरातील बाजारपेठेत पाणी शिरून काही दुकानांमध्ये ३३ जण अडकून पडले. रात्री उशिरा त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. आनंदवल्ली येथे रिक्षा गोदावरीच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने रिक्षातील तिघांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने ते बचावले. गोदावरी दुथडी भरून वाहात असताना पात्रालगतच्या भागातून एका चालकाने खासगी प्रवासी बस नेण्याचा प्रयत्न केला. यापुढे या बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते परंतु बस पुढे जाणार नाही हे लक्षात आल्यावर प्रवाशांना उतरवून बस क्रेनच्या साहाय्या ने बाहेर
काढण्यात आले.

पावसाने भात, टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. वारंवार पाऊस कोसळत असल्याने कृषी विभागाला नुकसानीचा अंदाज बांधण्यात अडचणी येत आहेत.नऊ तालुक्यांतील २८ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिन्नर, इगतपुरीतील काही भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. सिन्नर शहरातील सरस्वती नदीला अकस्मात आलेल्या पुराने बाजारपेठेत पाणी शिरले. नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. ३३ जण दुकानांमध्ये अडकून पडले. स्थानिक प्रशासनाने अंधारात जीवरक्षकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री साडेअकरा वाजता पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली. गंगापूर धरणातून पाणी सोडलेले असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. आनंदवल्ली येथील कमी उंचीच्या पुलावर पाण्याचा प्रवाह अकस्मात वाढल्याने गुरुवारी रात्री रिक्षा वाहून गेली. रिक्षातील तिघांनी तातडीने सुरक्षितस्थळी धाव घेतल्याने ते बचावले. शुक्रवारी सकाळी वाहून गेलेली रिक्षा शोधण्यासाठी अग्निशमन दलाने शोध मोहीम राबविली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सहा तास प्रयत्न करूनही रिक्षा सापडली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. गोदावरीचा प्रवाह वाढलेला असताना दुपारी खासगी प्रवासी बस चालकाने पात्रालगतच्या भागातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नंतर चालकाला बस बाहेर काढताना कसरत करावी लागल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पावसाचा जोर कायम राहिल्याने दारणा, मुकणे, कडवा, वालदेवी, गंगापूर, आळंदी, भोजापूर, नांदूरमध्यमेश्वर, पालखेड या धरणांमधून विसर्ग कायम आहे. पालखेडच्या विसर्गामुळे निफाड तालुक्यातील रौळस नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिन्नरच्या पश्चिम भागात टोमॅटोची रोपे जमीनदोस्त झाली. पावसाचा भात, बाजरी व मक्याला फटका बसला. २८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शन घडले.

नाशिक येथे गोदावरीला धरणातून पाणी सोडल्यावर गाडगे महाराज पुलाखाली खासगी आराम बस पाण्यात अडकली. क्रेनच्या मदतीने बस पाण्याबाहेर काढण्यात आली.