धुळे: जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी- सशक्त परिवार’ अभियानात आतापर्यंत २७ हजार १६८ महिलांची तपासणी करण्यात आली असून जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर एक हजार ६६८ रुग्णांची तज्ञांकडून तपासणी झाली अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे.
‘सशक्त स्त्री- सशक्त परिवार- सशक्त समाज’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी जिल्ह्यातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्तरावर ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ राबविण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या यां अभियानास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.यामुळेच या अभियानात आतापर्यंत जिल्ह्यातल्या २७ हजार १६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयस्तरावर एक हजार ६६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयक गरजांवर विशेष लक्ष केंद्रीत करून त्यांना मोफत आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे असा दावा यावेळी करण्यात आला.या शिबिरांमध्ये महिलांच्या वेगवेगल्ळ्या २० प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने गर्भवती माता, मधुमेह,दंत आरोग्य, कर्करोग, क्षयरोग, सिकलसेल, रक्तक्षय, पोषण व आहार सल्ला,गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आहार मार्गदर्शन, मुलांसाठी पोषण,मासिक पाळी स्वच्छता,माता बाळ सुरक्षा, आभा कार्डचे वितरण, सिकलसेल कार्ड वितरण, रक्तदान शिबिर, अवयवदान नोंदणी आदीचा समावेश आहे.आरोग्याचे असे अनेक उपक्रम यानिमित्त राबविण्यात येत आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून ‘नारी आरोग्य म्हणजेच परिवाराचे आरोग्य’ हा संदेश घरोघरी पोहोचविला जात असून जिल्ह्यातील महिलांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी केले आहे.