धुळे – जिल्हा पोलीस दलातर्फे गुंड, टवाळखोर आणि मद्यपींविरोधात कारवाईला गती देण्यात येत असताना पोलीस दलातीलच काही कर्मचाऱ्यांची बेशिस्ती मोहिमेआड येत आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एक निर्णय घेतला आहे.

पोलीस दलात या निर्णयाचीच चर्चा सुरु आहे. त्याचवेळी एका शाळकरी मुलीची छेड काढणार्या टवाळखोरांना धुळे शहर पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून पायी फिरवित त्यांची धिंड काढली. तसेच उघड्यावर मद्यप्राशन करणार्यांसह टवाळखोरी करणार्या युवकांविरोधात कारवाई केली. याशिवाय दामिनी पथकात नवीन तीन महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

धुळे जिल्ह्यासह शहरात शांतता आणि सौहार्द टिकून राहण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना गुंड, महिला, मुलींची छेड काढणार्या टवाळखोरांना धडा शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलीस अधिकार्यांनी कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

धुळ्यातील कमलाबाई शाळेतील मुलीची छेड काढणार्या तीन युवकांना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांना पायी बाजारपेठेत फिरविले. तसेच ‘आम्ही मुलींची छेड काढणार नाही, टवाळखोरपणा करणार नाही’ असे त्यांच्याकडून वदवून घेत कान धरुन माफी मागायला लावली. याशिवाय आझाद नगर, देवपूर, पश्चिम देवपूर या पोलीस ठाण्यांमधील अधिकार्यांनीही टवाळखोरांना पकडून त्यांना उठबशा घालायला लावून धडा शिकविला.

रस्त्याच्या कडेला बसून उघड्यावर मद्यप्राशन करणार्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली. या कारवाईचे धुळेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेल मध्ये गटबाजी करणारे, बेशिस्तपणे वागणूक आणि कामात हलगर्जीपणा करणार्या महिला अधिकारी व कर्मचार्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची बेशिस्ती, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संदेश या कारवाईतून अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. तसेच दामिनी पथकात नव्याने तीन महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. भरोसा सेल आणि दामिनी पथकांनी महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्याावे, तसेच सतत शाळा, महाविद्यालयांजवळ गस्त घालावी,अशा सूचनाही अधीक्षक धिवरे यांनी केल्या आहेत.