नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज | Doubts on controlling the number of stray dogs amy 95 | Loksatta

नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज

मोकाट जनावरांचे कोंडवाडा व्यवस्थापनही ठप्प

नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज
भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका

अनिकेत साठे

शहरात अंदाजे ४० ते ४५ हजार मोकाट श्वान असून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महिन्याकाठी ८०० ते हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले जात आहे. यावर बराच खर्च होऊनही ती संख्या खरोखरच नियंत्रणात राहिली का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, रस्ते, चौक व कॉलनी परिसरात श्वान वाढलेले दिसतात. त्यांच्या हल्ल्यात अनेकदा बालके जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. त्यांचा मुक्त संचार अपघाताचे कारण ठरतो.दुसरीकडे रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीत अडथळे निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांचे कोंडवाडा व्यवस्थापन अनेक महिन्यांपासून ठप्प आहे.
नांदुरनाका ते जत्रा हॉटेल मार्गावर मोकाट श्वान आडवा आल्याने दुचाकीवरून पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यापूर्वी श्वानामुळे अनेकदा अपघात होऊन वाहनधारक जायबंदी होण्याचे प्रकार घडलेले आहेत. काही भागात श्वानांची इतकी दहशत आहे की, जीव मुठीत धरून मार्गस्थ होण्याची वेळ येते. मागील काही वर्षांपासून महानगरपालिका मोकाट श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करते. रेबीज विरोधी लसीकरण कार्यक्रम राबविते. परंतु, सर्वत्र श्वानांच्या झुंडी दिसत असल्याने निर्बीजीकरणाचा हेतू कितपत साध्य झाला, याबद्दल साशंकता आहे. तशीच स्थिती अनेक भागात मुक्तपणे फिरणाऱ्या गाई, बैल वा अन्य जनावरांची आहे. भाजी बाजार, मध्यवर्ती बाजारपेठा तसेच अनेक रस्त्यांवर त्यांचे कळप ठाण मांडून बसतात. वाहतुकीस अडथळे येतात. परंतु, जनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

हेही वाचा >>>जळगाव: बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू; एरंडोल तालुक्यातील घटना

मनपाच्या पशु वैद्यकीय विभागाकडे मोकाट श्वानांबाबत विविध भागातून दररोज पाच ते सहा तक्रारी येतात. यातील काही श्वानांनी चावा घेतल्याच्या असतात. काही परिसरात श्वानांची वाढती संख्या, रात्री भुंकल्याने होणारा त्रास, अंगणात घाण करून जाणे अशा स्वरुपाच्या तक्रारी असतात. विभागाचे पथक प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करते. शस्त्रक्रिया न झालेले श्वान असेल तर त्याला उचलून आणले जाते. चावल्याच्या तक्रारीत संबंधित श्वानाला निरीक्षणाखाली ठेवले जाते, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्वानाच्या कानाला विशिष्ट खूण केली जाते. नंतर त्याला ज्या भागातून उचलण्यात आले होते, तिथेच सोडले जाते.

पशूवैद्यकीय विभागाचा दावा
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोकाट व भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया केली नसती तर श्वानांचा प्रचंड उपद्रव वाढला असता, याकडे महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाकडून लक्ष वेधले जाते. मादी वर्षाला दोन वेळा पिल्ले देते. त्यामुळे एका मादीपासून वर्षाला १० पिल्ले जन्म घेतात. शहरात ४५ हजार मोकाट श्वानांची संख्या गृहीत धरल्यास त्यातील निम्म्या मादी असतील. हा विचार केल्यास वर्षाला दोन लाखहून अधिक श्वान वाढू शकतात. सद्यस्थितीचा विचार केल्यास शस्त्रक्रियेद्वारे त्यांची संख्या सिमित राखण्यात आल्याचा दावा या विभागाकडून केला जात आहे.

मोकाट जनावरांच्या उपद्रवात वाढ
शहरात भटक्या श्वानांबरोबर मोकाट गाई, बैल तसेच इतर जनावरांचा उपद्रव वाढत आहे. या जनावरांचे कोंडवाडा व्यवस्थापन केले जाते. त्या अंतर्गत पशुवैद्यकीय विभागाची पथके मोकाट जनावरे पकडून नेतात. मालकाला नोटीस दिली जाते. १० दिवसांत ही जनावरे मालकाने न नेल्यास ती गोशाळेत दिली जातात. गेल्यावर्षी कोंडवाडा व्यवस्थापन प्रभावीपणे झाले होते. मात्र सहा ते सात महिन्यांपासून हे कामकाज ठप्प असल्याने जनावरे मोकाट सुटल्याची स्थिती आहे. कोंडवाडा व्यवस्थापनाचे ठप्प झालेले कामकाज पुढील एक, दोन महिन्यात सुरू होईल, असे मनपाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 22:28 IST
Next Story
जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या