धुळे – वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली परत करण्यासाठी लागणारा उपविभागीय अधिकारी यांचा लेखी आदेश देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने वाहन चालकासह खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक मुकेश विसपुते (३५. रा. विमल नगर, शिरपूर) आणि बॉबी उर्फ प्रशांत सनेर ( ५०, रा. शाहू नगर, देवपूर, धुळे) अशी लाच मागणाऱ्या दोघांची नावे आहेत. यापैकी बॉबी हा खासगी व्यक्ती आहे. तक्रारदारांचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली असून ते या वाहनांतून वाळू या गौण खनिजची वाहतूक करताना आढळले होते. त्यामुळे महसूल विभागातर्फे झालेल्या कारवाईत ही वाहने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली तक्रारदार यांना परत देण्यासाठी शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या लेखी आदेशाची गरज असल्याने हा आदेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात खासगी व्यक्ती बॉबी उर्फ प्रशांत सनेर याने वाहन चालक मुकेश विसपुते यांच्या मार्फत २० हजार रुपये लाचेची मागणी केली. हा प्रकार २६ डिसेंबर २०२३ रोजी घडला होता.

हेही वाचा – जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

हेही वाचा – परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प

तक्रारदार यांनी या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या चौकशी व खात्री केल्यावर यात तथ्य आढळून आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरपूर येथे सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बुध‌वारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver of shirpur sub divisional officer detained in bribe case ssb