जळगाव – मुक्ताईनगर तालुक्यात पुरनाड फाट्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दाम्पत्यासह १५ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, संतप्त जमावाने डंपर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

मुक्ताईनगरात इंदूर-हैदराबाद महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामावर असलेल्या एका डंपरमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. नितेश जगतसिंह चौहान (४५), सुनिता नितेश चौहान (३५) आणि सुखविंदर नितेश चौहान (१५, तिन्ही रा. मातापूर, ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर नेहाल नितेश चव्हाण, हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

मध्य प्रदेशातील मूळ रहिवाशी असलेले चौहान कुटुंब जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील परिसरात सध्या वास्तव्यास होते. कामानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात गेले असता पती-पत्नी आणि दोन्ही मुलगे महामार्गाच्या कडेला पुरनाड फाट्याजवळ सकाळी ११.१५ वाजता दुचाकीसह उभे होते. कंत्राटदाराचा एक डंपर बऱ्हाणकडून अचानक भरधाव वेगाने आला.

महामार्गाच्या कामासाठी वापरले जाणारे मटेरिअल घेऊन जात असलेला डंपर वळविताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. दुचाकीसह महामार्गाच्या कडेला उभे असलेले नितेश चव्हाण, सुनिता चौहान, त्यांची मुले सुखविंदर आणि नेहाल यांना तो धडकला. यावेळी अपघातात पती-पत्नी आणि सुखविंदर याचा डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.

दुसरा मुलगा नेहाल हा डंपरने धडक दिल्यानंतर महामार्गाच्या बाजुला फेकला गेल्यामुळे सुदैवाने वाचला. मात्र, अपघातात त्यालाही गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आजुबाजुला असलेल्या नागरिकांनी डंपरला थांबवून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धाव घेत आग तातडीने विझवून चालक महेंद्र प्रसाद (रा. महुआबांध, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळी उपस्थित गृहरक्षक दलाचे जवान अमोल गुंजाळ यांनी अपघातातील जखमी मुलास तातडीने रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तसेच तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. सायंकाळी उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. महामार्गाच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर दरम्यानच्या महामार्गावर बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. याबद्दल नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.