नंदुरबार – जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आठ ते १० किलोमीटरची पायपीट करून मोर्चेकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. महिला कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि उपस्थिती लक्षणीय होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील नऊ हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तीन दिवस सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या शासकीय कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय मोर्चाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासूनच तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर कर्मचारी जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी दहाच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. नेहरू पुतळा, सोनार खुंट, साक्रीनाकामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी अवघ्या पाच जणांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाण्याची अनुमती दिली.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात एक हजार ५६ संपकरी महसूल कर्मचाऱ्यांना नोटीस

हेही वाचा – धुळे जिल्ह्यातील सर्व संपकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची जाहीर नोटीस; संपकऱ्यांचा मोर्चा

जिल्हाधिकारी नसल्याने कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन दिले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटाच्या नेत्यांनी जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत चालढकल थांबवून शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अथवा राज्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या निवृत्तीवेतनाचा त्याग करून आपण शासकीय कर्मचाऱ्यांसमवेत असल्याची भूमिका घेऊन दाखवावी, असे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले. दरम्यान, चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शासकीय कार्यालये ओसाड पडली आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employees demanding old pension scheme marched at nandurbar collector office ssb