नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ६०८ घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मिटर बसविल्यानंतर एक जुलैपासून दिवसाच्या वेळेतील वीज वापर दरातील सवलतीचा लाभ मिळू लागला आहे. या ग्राहकांना अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुमारे ३० लाख ८३ हजार रुपयांची सवलत वीज देयकात मिळाली.
महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. नाशिक मंडळात एकूण १२ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी एक लाख ४२ हजार ६०८ ग्राहकांनी नवीन टीओडी मीटर बसवले असून ते आता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत वापरल्या जाणाऱ्या सवलतीतील विजेचा लाभ घेत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. नाशिक मंडळात ७१ हजार ७६८, मालेगाव मंडळात १९००७, अहिल्यानगर मंडळात ५१ हजार ८३३ ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसविले आहेत. यामुळे दोन महिन्यात त्यांच्या वीज देयकात ३० लाख रुपयांची बचत झाली. आकडेवारीचा विचार करता सरासरी प्रतिग्राहक २१ रुपयांनी देयक कमी झाल्याचे लक्षात येते.
विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीज दरात घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा सुरु झाला आहे.
दरम्यान, नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक मापन होणार असल्याने अचूक देयके मिळतील आणि घरातील विजेचा वापर दर अर्धा तासाला संबंधित ग्राहकांना भ्रमणध्वनीवर पाहता येईल. त्यामुळे वीज वापरावर देखील थेट नियंत्रण राहणार आहे. तर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्राहक घरातील मुख्यत्वे कपडे धुण्याचे यंत्र, गिझर, वातानुकूलीत यंत्र व इतर उपकरणांचा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा होणार आहे. ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवतानना या मीटरचा फायदा असल्याकडे महावितरणकडून लक्ष वेधले जाते.
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर मोफत
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. महावितरण एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावत आहे. सोबत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत आहेत. त्यामुळे टीओडी आणि नेट मीटर ग्राहकांकडे लावताना नियुक्त संस्था वा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या मीटरसाठी कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास, न देता नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क करावा वा तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे