चार संशयित येवला पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना प्रलोभन दाखवीत त्यांचे अपहरण करून कुटुंबीयांकडे दोन कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार येवला येथे घडला. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी पहाटे पाच वाजता येवला तालुक्यातील गुजरखेडा येथे संशयित राहुल पवार (२०, रा. नवसारी गाव), नीलेश, तृतीयपंथी पूजा ऊर्फ दिनेश सोळसे (रा. कोपरगाव) आणि अन्य एक यांनी अल्पवयीन असलेल्या दोन मुलींना प्रलोभन दाखवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर राहुलने या दोन्ही मुलींना पूजाकडे पोहोचते केले. सर्व संशयितांनी संगनमत करून राहुलच्या भ्रमणध्वनीवरून मुलींच्या आईकडे मुली हव्या असतील तर दोन कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास मुलींना मारून टाकू अशी धमकी दिली.
या संदर्भात आईने तातडीने येवला तालुका पोलीस ठाणे गाठले. या घटनेची दखल घेत मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, येवला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांनी शोधपथक तयार केले. हे पथक संशयितांच्या मागावर असताना संशयित मुलींच्या आईला वारंवार भ्रमणध्वनीवरून धमकी देत होते. या सर्व घडामोडी सुरू असताना पथकाने काही बनावट नोटा मुलींच्या आईकडे देत संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी पैसे घेऊन जाण्यास सांगितले. शिर्डी येथे गेल्यावर संशयितांनी त्या मुलींच्या आईशी प्रत्यक्ष संपर्क करत पैसे घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेतले.
संशयित युवकाकडे चौकशी केली असता मुली सुरक्षित असून तळेगाव-संगमनेर रस्तावरील निळवंडे येथील डोंगरावर असलेल्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी सोमवारी पहाटे मंदिर गाठत मुलींना ताब्यात घेतले. त्यावेळी मुलीचा मित्र आणि तृतीयपंथी पूजा त्या ठिकाणी होते. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत संशयितांवर गुन्हा दाखल केला. या घटनेतील मुख्य संशयित राहुल पवार आणि नीलेश दोघेही सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.