जळगाव – शहरातील सराफ बाजारात अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ- उतार सुरू असले, तरी दोन्ही धातुंचे दर एक लाखांच्या खालीच होते. सोमवारपासून सुरू झालेली तेजी मंगळवारीही कायम राहिल्याने सोने, चांदीचे दर पुन्हा उच्चांकी दराकडे झेपावतात की काय, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.
जळगावमध्ये ३१ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ४६८ रुपये होते. नंतरच्या दोन दिवसात १५४५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोमवारी सोने एक लाख १३ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. मंगळवारी तेच दर कायम राहिले. चांदीचे दर देखील ३१ मे रोजी एक लाख एक हजार ४५५ रुपये प्रतिकिलो होते. नंतरच्या दोन दिवसात १५४५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीही एक लाख तीन हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत जाऊन पोहोचली.
मधल्या काळात विशेषतः सोन्याचे दर काहीसे कमी झाले होते. मात्र, अमेरिकन डॉलरमध्ये आलेली कमजोरी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी हळूहळू वाढताना दिसत आहे. ज्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत. चांदीच्या दरातही सकारात्मकता दिसत असून, दोन्ही धातुंचे दर आगामी काळात कमी-अधिक फरकाने तेजीतच राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.