जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत पाडव्याच्या दिवशी बुधवारी दिवसभरात सोने, चांदीचे दर अचानक कोसळल्याने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. भाऊबीजेच्या दिवशी विशेषतः सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल झाला. सोन्यातील मोठ्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. परंतु, नफा वसुली आणि जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात पाडव्याला मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी झाल्याने आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. मात्र, दिवाळीनंतरच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर, गुरूवारी सकाळी १०:४७ वाजता सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव ४,०९१.५७ डॉलरपर्यंत होता. जो सोन्याच्या दरात अंदाजे १.०२ टक्के वाढ दर्शवितो. पाडव्याला झालेल्या घसरणीनंतर, भाऊबीजेला सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, बाजारात पुन्हा सोन्याच्या दराची पुनरूज्जीवनाची चिन्हे दिसून आली आहेत.

शहरात १७ ऑक्टोबरला सोन्याचे दर एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. परंतु, धनत्रयोदशीला तब्बल २७८१ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह एक लाख ३२ हजार ३५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर लक्ष्मीपूजनाआधी सोमवारी दिवसभरात १०३ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर एक लाख ३२ हजार २५२ रुपयांवर स्थिरावले होते.

मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणखी ६२० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख ३२ हजार ८७० रुपयांवर पोहोचले. परंतु, बुधवारी बालिप्रतिपदेला सकाळी बाजार उघडताच त्यात तब्बल ४१२० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत घसरले. दुपारनंतर आणखी २०६० रूपयांची घट नोदवली गेल्याने सोने एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले. मात्र, भाऊबीजेला सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत पोहोचले.

चांदीचे दर स्थिर

जळगावमध्ये १५ ऑक्टोबरला चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९२ हजार ६१० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर मात्र चांदीच्या दरात कमी-अधिक प्रमाणात घसरण सुरू झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी देखील चांदीचे दर एक लाख ६९ हजार ९५० रूपयांवर स्थिर होते. मात्र, बुधवारी बालिप्रतिपदेला सकाळी बाजार उघडताच तब्बल ५१५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६४ हजार ८०० रूपयापर्यंत खाली घसरले. त्याच प्रमाणे दुपारनंतर आणखी ५१५० रूपयांनी दर घटल्याने चांदी एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत खाली आली. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी सकाळी बाजार उघडल्यावर कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.