जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने दरात दिवसागणिक वाढ होत आहे. शुक्रवारी देखील सोन्याने गुरूवारचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. सोने दरातील उच्चांकी घोडदौड थांबायचे नाव घेत नसल्याने ग्राहकांसह व्यावसायिक अवाक झाले.
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण दिसत आहे. एमसीएक्सवर दोन्ही धातुंच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. गुरूवारी जीएसटीतील दर कपातीमुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याने झेप घेत १० ग्रॅमसाठी तब्बल ५०९ रुपयांची वाढ नोंदवली. याचबरोबर चांदीही चमकली आणि तिच्या दरात पुन्हा १०३० रूपयांची वाढ झाली. गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातुंकडे वाढताना दिसत आहे. सोन्याच्या किमतींनी उच्चांकी पातळी गाठण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे दिसून येत आहेत. अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत. कमकुवत अमेरिकन अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हकडून मिळणारे संकेत यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता यामुळेही गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. रुपयाच्या कमजोरीसोबतच परदेशी बाजारपेठेत होत असलेल्या दरवाढीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो आहे. त्यामुळे देशांतर्गत सोन्याचे भाव सतत नवे उच्चांक गाठत असून, दिवाळीपूर्वी ते आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. भारतातील सोन्याच्या किमतींवर अनेक घटकांचा थेट परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात शुल्क, कर प्रणाली आणि डॉलर-रुपया विनिमय दरातील चढउतार यामुळे सोने दरात दररोज सतत चढ-उतार होत असतात. भारतात सोन्याला केवळ दागिन्यांच्या रूपातच नव्हे तर सुरक्षित गुंतवणूक आणि बचतीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि पारंपरिक समारंभात सोन्याची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे भाव वाढले तरीही सोन्याचे आकर्षण कमी होत नाही; उलट ते प्रतिष्ठा, परंपरा आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. जळगावमध्ये गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख नऊ हजार ५९२ रूपयांपर्यंत होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच ५०९ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १० हजार १०१ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. सोन्याने प्रथमच एक लाख १० हजाराचा आकडा ओलांडल्याने सुवर्ण बाजारपेठेत मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
चांदीत १०३० रूपयांची वाढ
जळगावमध्ये गेल्या चार दिवसांपासून चांदीचे दर एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत स्थिर होते. त्यात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो उच्चांकी एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.