जळगाव – लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश आणि हैराण झालेल्या ग्राहकांना बुधवारी सकाळी काहीसा दिलासा मिळाला. शहरातील सराफ बाजारात मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत घसरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगावमध्ये गुढीपाडव्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेली घसरण पुढील काही दिवस कायम राहिल्याने सोने ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत खाली आले होते.  मात्र, नऊ एप्रिलला पुन्हा उसळी घेतलेल्या सोन्याचे दर प्रतितोळा ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दरवाढीत सातत्य राहिल्याने २२ एप्रिलपर्यंत सोन्याचे दर उच्चांकी प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत स्थिरावले.

दरम्यान, गेल्या १४ दिवसात तब्बल १० हजार ५०६ रुपयांनी सोने वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिक अवाक झाले होते. अक्षय्य तृतियेच्या सणापूर्वीच सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालत असताना, पुढील काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. प्रत्यक्षात, बुधवारी सराफ बाजार उघडताच मंगळवारच्या तुलनेत तब्बल २३६९ रुपयांची घट सोन्याच्या दरात नोंदविण्यात आली. मागील दोन आठवड्यांपासून उच्च पातळीवर असलेल्या सोने दरात मोठी घट नोंदविण्यात आल्यानंतर विशेषतः सुवर्ण व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कारण, उच्चांकी दरवाढीनंतर सराफ बाजारातील सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ठप्प झाले होते. सोने दरातील घसरण एका दिवसापुरतीच राहते की अक्षय्य तृतियेपर्यंत त्यात सातत्य राहते, याकडे आता ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold prices in jalgaon see a big drop phm 00