नाशिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी संकल्प- संपूर्ण स्वास्थ्य उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नवरचना शाळेपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांनी दिली. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना ही जगातील सर्वात मोठी बालरोगतज्ज्ञ संघटना असून तिचे ४२ हजार सदस्य आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघटनेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाची संकल्पना मांडली गेली. जिल्ह्यातील शाळांमध्येदेखील हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यकारक सवयींचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व शाळांचे सबलीकरण करणे. विद्यार्थ्यांना जीवनशैलीशी निगडित असलेले आजार (उदा. स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच यकृत, मूत्रपिंड यांचे आजार व विविध प्रकारचे कर्करोग) याविषयी माहिती देण्यासह सुदृढ जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशी या उपक्रमाची उद्दिष्टे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जळगाव : सत्य शोधण्यासाठी पोलीस अधिकार्‍याने बैलगाडी हाकत गाठले घटनास्थळ

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना चौरस आहार, व्यायामाचे महत्व, भ्रमणध्वनी व गॅझेट्सचा मर्यादित वापर, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय योजना, व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहन यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देऊन शाळा हे आरोग्य संवर्धनाचे साधन व्हावे, अशी बालरोगतज्ज्ञ संघटनेची अपेक्षा आहे. जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालेय व्यवस्थापक व शिक्षकांनी ९५९५१६०२१८, ८२७५०७२४४० या क्रमांकावर संपर्क साधावा.

नवरचना शाळेतून शुभारंभ

या उपक्रमाचा शुभारंभ नवरचना विद्यालय येथील कार्यशाळेतून करण्यात आला. यात इयत्ता नववीचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. साधना पाटील, डॉ. अतुल कणीकर, डॉ. सुलभा पवार, डॉ. तृप्ती महात्मे, डॉ. रिना राठी यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक म्हणून बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक किशोर पालखेडकर, मुख्याध्यापिका शीतल पवार यांसह मदतनीस म्हणून शिक्षिका चांदगुडे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेस डॉ. अमोल पवार (सचिव), डॉ. श्याम चौधरी (उपाध्यक्ष, राज्य बालरोग तज्ञ संघटना), डॉ. मिलिंद भराडिया (समन्वयक), डॉ. अनिरूध्द भांडारकर (अध्यक्ष, नाशिक बालरोग तज्ञ संघटना) आदींचे सहकार्य लाभले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance to school students for better physical and mental health ysh