नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दळणवळण सुविधांचा विस्तार नियोजित असताना नाशिक विमानतळावर इमिग्रेशन तपासणी केंद्राला (परदेशी प्रवासासाठी) मंजुरी मिळण्यात विलंब होत आहे. विमानतळावर नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे इमिग्रेशन तपासणी केंद्राला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

नाशिकच्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या संदर्भात खा. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत इमिग्रेशन विभागाच्या तपासणीनंतर नाशिक विमानतळावर इमिग्रेशन केंद्र (चेक पॉइंट) उभारणीला सरकारने मान्यता दिली का, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रणाली व कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव, ही सुविधा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू होईल का आणि या संदर्भात आंतर-मंत्रालयीन समन्वयासाठी उचललेली पावले असे प्रश्न उपस्थित केले. त्यास केंद्रीय गृहराज्यमंत्री बांदी संजय कुमार यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले.

इमिग्रेशन विभागाने (बीओआय) नाशिक विमानतळावरील पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करून शिफारस केली की, नाशिक विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तपासणी अर्थात इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी उपलब्ध असलेली जागा नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे चालविण्यासाठी पुरेशी नाही, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सद्यस्थितीत केवळ मालवाहू व भाड्याने घेतलेल्या विमानाचे (चार्टर्ड फ्लाइट) कर्मचारी व प्रवाशांना सामावून घेण्यास ही जागा पुरेशी आहे. विमातळावर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मालवाहूसाठीच्या पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि इमिग्रेशन प्रणाली उपलब्ध आहे. या शिवाय, काही पोलिस अधिकाऱ्यांना इमिग्रेशन तपासणी करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण संबंधित विभागाने दिले असल्याची माहिती गृह विभागाने दिली. मात्र नियमित आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.

नाशिक हे उद्योग, अध्यात्म, व्यापार, कृषी, पर्यटन या सर्वच बाबतीत महत्वाचे केंद्र आहे. नाशिकमध्ये आंतराष्ट्रीय हवाई सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाश्यांना त्याचा लाभ होईल, शिवाय मुंबईवरील अधिकचा भार देखील कमी होऊ शकेल. असे खा. राजाभाऊ वाजे यांनी लक्ष वेधले आहे.

कुंभमेळ्यासाठी गरज

प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन नाशिक विमानतळावर नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्याची मागणी होत आहे. परदेशी प्रवासासाठी तपासणी (इमिग्रेशन) केंद्र मंजूर झाल्यास कुंभमेळ्यात नाशिक विमानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी करता येणार आहे. उड्डाण क्षमता वाढविण्यासाठी एचएएलने अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी मंजूर केलेली आहे.