धुळे: अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोन मुलांना वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यात सहभागी धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकातील तीन जवानांचा बोट उलटून जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे घडली.

राहुल पावरा (रा. शंभर क्वाॅर्टर इमारत क्रमांक सहा, खोली क्रमांक पाच), प्रकाश शिंदे (रा. ४३७ क्वाॅर्टर इमारत क्रमांक तीन, खोली क्रमांक चार) आणि वैभव वाघ (रा. पांढरद, भडगाव) अशी या जवानांची नावे आहेत. पावरा यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली तर वैभव यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा : नाशिक तापले; पाच वर्षानंतर नाशिकचा पारा पुन्हा ४२ अंशावर

यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ मे रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता वनविभाग मंत्रालयाच्या आदेशाने धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पथक क्रमांक दोन सुगाव बुद्रुक येथे बचाव कार्यासाठी रवाना झाले होते. या ठिकाणी पोहचल्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजता शोध व बचाव कार्य सुरू असतांना बोट पाण्याच्या भोवर्‍यात अडून ती उलटली. या अपघातात शिंदे, वाघ आणि पावरा हे जखमी झाले. त्यांना अकोले येथील रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे श्रद्धांजली वाहून पार्थिव कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.