धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात हाडाखेड आणि आसरापाणी या दोन गाव शिवारात शनिवारी सकाळी पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमच संयुक्त कारवाई करुन गांजाची झाडे जप्त केली. सुमारे ५२ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. भियासिंग पावरा (रा.आसरापाणी, ता.शिरपूर) हा कसत असलेल्या आसरापाणी गाव शिवारातील वनजमिनीवर गांजाची शेती करण्यात आल्याची माहिती निरीक्षक हिरे यांना शुक्रवारी मिळाली. शेतीतील पक्व झालेल्या गांजाच्या झाडांची खुडणी सुरु असल्याचे कळल्यावर पोलिसांनी छापा टाकण्याची तयारी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी काशिराम देवरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या सहभागातून शनिवारी सकाळी संयुक्त कारवाई करण्यात आली.

यावेळी भियासिंग पावरा याच्या वनशेतीत ११२. ७५० किलो सुका गांजा आणि ८०० किलो ओल्या गांजाची झाडे मिळून आली. वनपरिक्षेत्र अधिकारी काशिनाथ देवरे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना परिसरात गांजा शेती शोधण्याचे आदेश दिल्यावर आसरापाणी शिवारापासून साधारणपणे पाच किलोमीटरवर हाडाखेड गाव (ता.शिरपूर) शिवारात वनजमिनीत गांजा शेती केलेली दिसली. हे वनजमिनीचे क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा (रा. हाडाखेड, शिरपूर, धुळे) हा कसत असल्याचे वनविभागाच्या अभिलेखावरून उघड झाले. या वन जमिनीत अंदाजे एक एकर क्षेत्रात २४ लाख रुपयांची जवळपास १२ किलो गांजाची झाडे मिळून आली.

पोलीस छापा टाकणार असल्याची चाहुल लागल्याने दोन्ही ठिकाणावरुन संशयित फरार झाले. या कारवाईत ११ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा ११२ किलो सुका आणि ४० लाख रुपयांची ओल्या गांजाची झाडे असा ५१ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अनिल शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक धिवरे यांच्यासह अपर अधीक्षक किशोर काळे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.

कारवाईत वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग

कारवाईत वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे,मनोज कचरे, मुकेश पावरा, अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी काशिनाथ देवरे, वनपाल कपिल पाटील, दीपिका पालवे, वनरक्षक किरण साळुंखे व राजेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule district cannabis farm destroyed asj