मालेगाव : शहर व तालुका भागात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज माफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यास अटकाव करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. अवैध मुरूम वाहतूक करणारे वाहन पकडल्यावर ते सोडून देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून अप्पर तहसिलदारांवर दबाव आणण्याचा प्रकार नुकताच घडला होता. असे असताना संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल न करता महसूल विभागाने बोटचेपी भूमिका निभावली,अशी तक्रार करत काही जागरुक सामाजिक कार्यकर्त्यांनी गौण खनिज माफियांना कुणाचे अभय मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिजांचे उत्खनन व चोरी होत आहे. अवैध पद्धतीने खडी क्रेशर, खानपट्टे व वीटभट्टया बिनदिक्कतपणे सुरू आहे. खडी, माती, मुरूम या गौण खनिजांची खुलेआम वाहतूक होत असल्याचे दृश्य दिसत आहे. त्याला अटकाव घातला जात नसल्याने महसूल प्रशासनाच्या आशीर्वादामुळे हे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे की काय, असा संशय निर्माण होत आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे खडी,माती व मुरूमची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील चांगले रस्ते खराब होत आहेत तसेच गौण खनिज उत्खननामुळे जागोजागी मोठमोठाले खड्डे तयार झाले आहेत,याकडे या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भात तालुक्यातील खडकी ते हाताणे या रस्त्याचे वाणगीदाखल उदाहरण देण्यात आले. ७० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेला हा रस्ता एक महिन्यात उखडला गेला व झालेला खर्च पाण्यात गेला, अशी तक्रार या कार्यकर्त्यांनी केली आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाचे प्रयत्न आधीच कमी पडत असताना जी थातूरमातूर कारवाई केली जाते, त्याच्यातही माफियांकडून अडथळा आणला जात असल्याचा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे. अप्पर तहसिलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने मध्यंतरी गौण खनिजाची चोरी करणारे वाहन पकडण्याची कारवाई केली होती. यासंदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान राजकीय क्षेत्रातील एका व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून हे वाहन सोडून देण्यासाठी देवरे यांच्यावर दबाव आणला होता. मात्र पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत संबंधित व्यक्तीचे संशयित म्हणून नाव नमूद करण्यात आले नाही.
वास्तविक संबंधित व्यक्तीने सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने तसा गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते. मात्र, कुठलाही गुन्हा दाखल न झाल्याने या व्यक्तीविषयी महसूल विभागाने नरमाईची भूमिका का घेतली,असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. गौण खनिजांची जी चोरी होत आहे, त्या प्रकाराची कसून चौकशी करण्यासाठी मालेगाव तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांची समिती गठीत करावी. तसेच गौण खनिज चोरी करणारे वाहन पकडल्यानंतर ते सोडून देण्यासाठी दबाव आणणाऱ्या व्यक्ती विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.