मनमाड – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सरदार पटेल रस्त्यावर उभ्या दुचाकीला अन्य दुचाकीची धडक देऊन पाडण्याच्या वादातून एका युवकाने धारदार शस्त्राने व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह त्यांचा भाऊ आणि पुतण्यावर हल्ला केला. जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेबाबत व्यापाऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. संशयितास पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी त्यास न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सरदार पटेल रस्त्यावर अनिल पारिक (५८) हे कामानिमित्त कंदळकर यांच्या भांड्याच्या दुकानात आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी दुकानासमोर उभी केली. रस्त्याने मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका युवकाने त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन ती पाडली. याबाबत अनिल यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता त्याने वाद घालण्यास सुरूवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तरूणाने धारदार शस्त्राने अनिल यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला. वाद सोडविण्यासाठी आलेले त्यांचे बंधू आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक (६२), त्यांचा पुतण्या द्वारकेश पारिक (३०) यांच्यावर देखील शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र, अनिल, द्वारकेश हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांसह व्यापाऱ्यांची गर्दी झाली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि कुटुंबातील दोघांवर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि या घटनेची चौकशी करावी, संशयितांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना निवेदन देणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, या बाबत सोमवारी रात्री अनिल पारिक (५७) यांनी तक्रार दिली. संशयित अल्तमशने मोटरसायकलला धडक मारली. याचा जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने चाकूने राजेंद्र पारिक, तक्रारदार अनिल आणि द्वारकेश पारिक यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा अल्तमश शेखला (२२) अटक करण्यात आली. मंगळवारी त्यास मनमाड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.