नाशिक : तालुक्यातील सारुळ, राजुर बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित १५ खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सारूळ ,राजुर बहुला व पिंपळद या परिसरातील गौण खजिन उत्खननाचा विषय चांगलाच गाजत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने २१ खडी क्रशरवर कारवाई करीत ते बंद केले होते. परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला होता. खडीक्रशर चालकांनी नियमांचे पालन केले नसल्याने ही कारवाई झाल्याचे सांगितले गेले. या कारवाई विरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सुनावणी घेत उपरोक्त निर्णय दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खाणपट्टेधारकांनी खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. खाण पट्ट्यात किती उत्खनन झाले, याची बहुतेकांनी दैनंदिन नोंद ठेवलेली नव्हती. खाणपट्टा परिसरात सीमांकन नव्हते. डोंगर-टेकडी फोडताना सहा मीटर नियम पाळला गेला नाही. खाणपट्ट्याचा करारनामा न करणे असे प्रकार उघड झाले. टेकड्यांचा चढ आणि उतार यावर गौण खनिजाचे उत्खनन करता येत नाही. अटी व शर्तीत ते नमूद असूनही त्या ठिकाणी उत्खनन झाले.

हेही वाचा : नाशिक दुष्काळाच्या छायेत, पिके करपली; धरणसाठा केवळ पिण्यासाठीच, सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर

ज्या ठिकाणी खाणपट्टा डोंगराळ भागात आहे, तिथे डोंगर रांगांचे उभे उत्खनन करता येत नाही. या नियमाची पायमल्ली झाली. या त्रुटींबाबत खाणपट्टाधारकांना नोटीस बजावत खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली होती. संबंधितांचा खुलासा केवळ नकारात्मक स्वरूपाचा असल्याने व आढळून आलेल्या त्रुटींबाबत कोणतीही समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याने अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी आता १५ खाणपट्ट्यांच्या उत्खननावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : धनादेश न वटल्याने मुंबईच्या व्यापाऱ्यांना कैद

जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी महाखनिज प्रणालीतील संबंधितांचे ऑनलाईन सुरू असलेले वाहतूक परवाने बंद करण्याचे आदेश दिले. यात शुभांगी बनकर, सिरील रॉड्रिक्स, हरिभाऊ फडोळ, श्रीराम स्टोन क्रशर, गणेश स्टोन मेटल, भगवती अर्थ मुव्हर्स, फ्रानिस सिरील रॉड्रिक्स, हेमंत लठ्ठा, अनिलकुमार कन्स्ट्रक्शन, अर्जुन नवले, मोतिराम नवले, निर्माण बिल्डमेट, गजानन नवले या खाणपट्टाधारकांचा समावेश आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik traffic licenses of the popular 15 mining lease holders suspended by district administration due to breach of terms and conditions css