नाशिक – नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव सोहळा दणक्यात पार पडला. नववर्षाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रवेशोत्सवाचा सोहळ्याचा अंक पार पडल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात आता दप्तराच्या ओझ्यावरुन वाद सुरु झाला आहे. वह्या, पुस्तकांच्या ओझ्यामुळे मुले दमून जात असून त्यांना आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

पहिलं पाऊल, बैलगाडीतून मिरवणूक, ढोल ताशांचा गजर, कुठे फटाक्यांची आतशबाजी, मिष्ठांनाचे जेवण असे बरेच उपक्रम घेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात दिमाखदार झाली. विद्यार्थ्यांना पहिल्या दोन दिवसात पाठ्यपुस्तकांचे वितरणही झाले. मात्र त्यानंतर आता दप्तराच्या ओझ्याची चर्चा सुरु झाली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षानिहाय वेगवेगळी पुस्तके ठरवली होती. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होईल, असे नियोजन होते.

परंतु, त्यातही लिहिण्यासाठी कोरी पाने ठेवण्यात आल्याने पुस्तकांचे वजन किती कमी झाले, हा प्रश्न होता. यंदा मोफत पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना एका विषयाचे एक पुस्तक दिले गेले. पुस्तक आणि एक वही, गृहपाठ वही या सर्वांचे वजन विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त होत आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या प्रयोगामुळे शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याविषयी नाशिक जिल्हा प्राथमिक विभाग मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी तसेच उन्नती प्राथमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक नंदलाल धांडे यांनी माहिती दिली. शिक्षण विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये प्रत्येक विषयाचे एकच पुस्तक आहे. काही ठिकाणी मागील वर्षाच्या तुलनेत ते कमी असेल पण ते पुस्तक आणि वही वर्षभर विद्यार्थ्यांना बरोबर ठेवावी लागणार आहे. यामध्ये जास्त पानांची पुस्तके विद्यार्थ्यांकडून हाताळतांना खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुस्तकांचे वजन साधारणत: २०० ते ८०० ग्रॅम सरासरी वाढले आहे. पहिली आणि दुसरीसाठी दोन सत्रात दोन पुस्तके ठेवली असती तर मुलांना हाताळणे सोपे झाले असते, असे मत धांडे यांनी मांडले.

इयत्ता पहिली ते आठवीसाठी प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक दिल्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या निर्णयाला तडा गेला आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांवर वेळोवेळी प्रयोग केले आहेत. स्वतंत्र पुस्तके काढून पुन्हा विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे नेण्यास भाग पाडले आहे. यापूर्वी द्विभाषिक पुस्तके तीन खंडामध्ये एका इयत्तेसाठी काढण्यात आलेले होते. त्यानंतर चार चार भागात पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दप्तराचे ओझे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली होती. परंतु, आता शिक्षण विभागाने पुन्हा सर्व विषयांची स्वतंत्र पुस्तके दिल्यामुळे दप्तराचे ओझे खूप वाढले असून विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालकांच्या मते एकात्मिक द्विभाषिक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी योग्य होती. तीन भागांमध्ये पुस्तकात संपूर्ण इयत्तेचा भाग समाविष्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. त्यानंतर चार भाग केले. तेही थोडे बरे होते. शिक्षण विभागाने पुन्हा एकात्मिक द्विभाषिक पुस्तके छपाई करून विद्यार्थ्यांना वितरित करावी, अशी मागणी पालकांकडून होत असल्याचे ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विलास सोनार यांनी सांगितले.

दप्तरांचे ओझे वाढल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखी, खांदेदुखीचा त्रास होत आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांकडून शाळेत जाण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एकात्मिक द्विभाषिक पुस्तकांची यापुढे छपाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणारी पुस्तके, वह्या यावरुन वाद होत असतो. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. परंतु, सातत्याने त्या उपायांपैकी एकही टिकत नाही. यंदाही नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताच विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा विषय चर्चेत आला आहे.