नाशिक – ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत यंत्रणेने मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी खाद्य पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाणारे तेल, दूध, तूप आदींचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री झिरवळ हे बोलत होते. दैनंदिन जीवनात भेसळमुक्त अन्न पदार्थ सेवन करणे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्यासाठी समन्वयाने कामकाज करावे, अशी सूचना त्यांनी केली.

राज्यात ऑगस्ट महिन्यापासून दिवाळीपर्यंत विविध सण- उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. या कालावधीत नागरिक मिठाई, खवा व इतर अन्न पदार्थ खरेदी करतात. त्यावेळी काही आस्थापनाकडून भेसळयुक्त, कमी दर्जाच्या पदार्थांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ११ ते १८ ऑगस्ट या कालावधीत मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी पदार्थांची तपासणी करावी. विविध आस्थापनांमध्ये वापरलेले तेल, दूध, तूप आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, तपासणीत त्रुटी आढळून येणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करावी, असे मंत्री झिरवळ यांनी सूचित केले.

सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप यांनी प्रास्ताविक केले, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनोद धवड यांनी आभार मानले. यावेळी अन्न, औषध प्रशासन विभागाचे विशेष कार्य अधिकारी हिरामण झिरवाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, सहायक आयुक्त (औषध) सुरेश देशमुख, महेश देशपांडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी राहुल बयाणी उपस्थित होते.

परराज्यातून येणाऱ्या पदार्थांची तपासणी

सणोत्सवाच्या काळात आरटीओ हद्दीतील टोल नाक्यावर परराज्यातून येणारे दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्याच आवश्यकता त्यांनी मांडली. या मोहिमेनिमित्त नरहरी झिरवळ यांनी सातपूर परिसरातील मिठाई दुकानास भेट देऊन पाहणी केली. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्याबाबत संबंधित आस्थापनेला सूचना दिल्या.