जळगाव – राज्य परिवहनाची शहर बससेवा बंद पडल्यापासून हाल सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १५ ऑगस्टपासून पीएम ई-बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात, आगार आणि चार्जिंग स्थानकाचे संथगतीने सुरू असलेले काम लक्षात घेता सदरची बससेवा सुरू होण्यास आणखी किमान चार महिने वाट पाहावी लागण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारच्या पीएम ई- बस योजनेच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी जेबीएफ इकोलाईफ कंपनीतर्फे १२ मीटर लांबीच्या २४ आणि नऊ मीटर लांबीच्या सहा तसेच सात मीटर लांबीच्या २० ई-बस पुरविण्यात येणार आहेत. त्या हिशेबाने महापालिका प्रशासनाने शहरातील शिवाजी उद्यानाच्या परिसरात टीबी रुग्णालयाच्या शेजारी आगार आणि चार्जिंग स्थानकाचे काम काही महिन्यांपासून हाती घेतले आहे. त्याठिकाणची पायाभूत सुविधांची सर्व कामे पूर्णत्वास आल्यानंतर ई- बस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह पाळधी, जळगाव खुर्द, म्हसावद, शिरसोली, उमाळा, कानळदा, विदगाव, शेळगाव, चिंचोली, धानवड, सावखेडा, हरीविठ्ठलनगर, खंडेरावनगर, मोहाडी, पिंप्राळा हुडको, कोल्हे हिल्स, मेहरूण, निमखेडी, गणेश कॉलनी, औद्योगिक वसाहत, अजिंठा चौफुली या मार्गांवर धावू शकणार आहेत. ठिकठिकाणचे थांबेही निश्चित करण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासनाने ई- बसेस उपलब्ध झाल्यानंतर साधारण १५ ऑगस्टपासून शहर बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आगार तसेच चार्जिंग स्थानकाचे काम बऱ्याच दिवसांपासून रेंगाळले आहे. ते तातडीने पूर्ण होण्याची शक्यता देखील नाही. त्यामुळे ई- बसेस मिळाल्या तरी त्या वापरात न येता एकाच जागेवर उभ्या राहतील. बसेस धावल्या नाही तरी महापालिकेला त्यासाठी आकारण्यात येणारी रक्कम केंद्र सरकारकडे नियमितपणे भरावी लागेल. त्यामुळे ई- बसेस थोड्या उशिरा मिळाल्या तर बरे होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
जळगाव महापालिकेला पहिल्या टप्प्यात ३० ई- बसेस मिळणार आहेत. त्यादृष्टीने जुन्या टीबी रुग्णालयाच्या शेजारी आगार आणि चार्जिंग स्थानकाचे कामे हाती घेतली आहेत. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने कदाचित ऑक्टोबरमध्ये बससेवा सुरू होऊ शकेल. – ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त, महापालिका जळगाव)