जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच आहे. सोमवारी देखील दोन्ही धातुंच्या किंमती मोठी दरवाढ नोंदवली गेल्याने नवीन उच्चांकावर पोहोचल्या. ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना त्यामुळे धक्का बसला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सोमवारी देखील सोन्याने सकाळच्या सत्रात प्रति औंस ३,९२० डॉलरचा आकडा गाठत विक्रमी उच्चांक नोंदवला. अमेरिकेत सुरू असलेल्या फेडरल सरकारच्या शटडाऊन आणि वाढत्या आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळण्याचा कल दाखवला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.

विश्लेषकांच्या मते, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता देखील दरवाढी मागील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण व्याजदर घटल्यास डॉलर कमजोर होतो आणि सोन्यात गुंतवणूक अधिक आकर्षक ठरते. सोन्यावर व्याज लागत नसल्याने गुंतवणूकदार व्याजदर कपातीच्या वातावरणात सोन्याकडे अधिक प्रमाणात वळतात.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर आर्थिक अस्थिरता कायम राहिली आणि व्याजदर कपात लवकरच अमलात आली, तर येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात. दिवाळीपूर्वी सोन्याने नवे विक्रम प्रस्थापित करणे सुरूच ठेवले आहे. देशांतर्गत मागणी, जागतिक अनिश्चितता आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे सोन्याच्या किमती १.२० लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. येत्या काळात डॉलर कमकुवत झाला आणि व्याजदरात कपात झाली तर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.

भारतीय बाजारपेठेत सणासुदीचा काळ सोन्याच्या खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत सोन्याची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गरिबांचे सोने म्हणून ओळखली जाणारी चांदीही ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे.

जळगावमध्ये शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २२ हजार ०५५ रूपयांपर्यंत होते. त्यात सोमवारी सकाळी बाजार उघडताच आणखी १३३९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख २३ हजार ३९४ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दिवाळी जवळ येत असताना सोन्याचे दर दररोज नवा उच्चांक करताना दिसत आहे. परिणामी, ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सोने आणखी किती मजल मारते त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चांदीत २०६० रूपयांनी वाढ

शहरात शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५३ हजार ४७० रूपयांपर्यंत होते. सोमवारी बाजार उघडताच तब्बल २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने जीएसटीसह एक लाख ५५ हजार ५३० रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.