जळगाव – शहरातील सफाईचे कंत्राट बीव्हीजी इंडिया कंपनीला देण्याचे निश्चित झाले असून संबंधितांनी सुमारे दीड कोटी रुपयांची अनामत आणि साडेतीन कोटी रुपयांची बँक हमी यापूर्वीच सादर केली आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने अद्याप कार्यादेश न दिल्याने सफाईचे काम सुरू करावे की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत कंत्राटदार कंपनी सापडली आहे. परिणामी, शहरातील अस्वच्छतेची समस्या आणखी तीव्र झाली आहे.

महानगरपालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला २०१८ मध्ये शहरातील सफाईचे कंत्राट पाच वर्षांसाठी दिले होते. याशिवाय, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया मंजूर होईपर्यंत काम करण्याच्या अटीवर वॉटरग्रेसला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, आधीची पाच वर्षे आणि मुदतवाढ दिलेल्या एका वर्षात सातत्याने स्वच्छतेच्या कामात कुचराई केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांच्या तीव्र असंतोषाला वॉटरग्रेसला तोंड द्यावे लागले आहे. त्यानंतरही जळगावमधून गाशा गुंडाळण्याची तयारी करण्याऐवजी वॉटरग्रेसने आता नव्याने राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत पुन्हा सहभाग घेतला.

तेवढ्यावरच न थांबता सफाईचे कंत्राट घेण्यासाठी स्पर्धेत असलेल्या बीव्हीजी इंडिया कंपनीने सर्वात कमी दरावर काम करण्याची तयार दर्शविल्यावर वॉटरग्रेसने न्यायालयाचे दार ठोठावले. सदरचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असताना नवीन निविदा प्रक्रिया बारगळल्याने इकडे जळगाव शहरातील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

दरम्यान, जनतेचा रोष लक्षात घेता सर्वात कमी दर सादर करणाऱ्या बीव्हीजी इंडियाला सफाईचे नवीन कंत्राट देण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असली तरी त्यात आतापर्यंत बरीच दिरंगाई झाली आहे. बीव्हीजी इंडियाने अनामत रक्कम आणि बँक हमी सादर करावी, असे पत्र महापालिकेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार बीव्हीजीने एक कोटी ५८ लाख रुपये अनामत तसेच तीन कोटी ५८ लाख रुपयांची बँक हमी सादर केली.

प्रत्यक्षात महापालिका आणि बीव्हीजी कंपनीत करारनामा तसेच कार्यादेश देण्याच्या पुढील प्रक्रियेला अद्याप चालना मिळालेली नाही. परिणामी, कंत्राट घेण्यासाठी उत्सुक असलेल्या बीव्हीजी इंडिया कंपनीला त्यांची यंत्रणा जळगाव शहरात हलविता आलेली नाही. कचरा उचलण्यासह वाहण्यासाठी काही नवीन वाहनांची गरज त्यांना भासणार आहे. त्याचीही व्यवस्था कार्यादेशाअभावी संबंधितांना करता आलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन एक ऑगस्टपासून शहरातील सफाईचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचा दावा करत असले तरी, कंत्राट प्रक्रियेतील सावळा गोंधळ लक्षात घेता त्याची शक्यता धुसर झाली आहे.

बीव्हीजी इंडिया कंपनीने सफाईच्या कंत्राटासाठी अनामत रक्कम भरून बँक हमीही दिली आहे. महापालिका आणि बीव्हीजी यांच्यात करारनामा झाल्यानंतर कार्यादेश देण्यात येतील. – उदय पाटील (सहायक आयुक्त, जळगाव महापालिका)

जळगाव शहराच्या सफाईचे कंत्राट घेण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. महापालिका प्रशासनाकडून कार्यादेश मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करता येईल. – श्रीकांत हंगे (बीव्हीजी इंडिया)