मोफत साडय़ा मिळवून देण्याचे आमिष दाखवित महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. मालेगाव येथे हा प्रकार घडला असून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव येथील वर्मा ज्वेलर्सजवळील साडय़ांच्या दुकानात खरेदीसाठी शैला मोगल (५५) या गेल्या होत्या.
त्यावेळी संशयित व्यक्ती त्यांच्याजवळ आली. त्या व्यक्तीने तुमच्यासारख्या गरीब स्त्रियांना साडीचे मोफत वाटप करतो, असे सांगितले. माझ्यासोबत या, मी साडय़ा देतो, असे आमिष त्याने दाखविले. मोफत साडी मिळेल म्हणून संशयिताबरोबर मोगल या वर्मा ज्वेलर्सजवळ असलेल्या एका साडी दुकानाजवळ आल्या. संशयित तेथेच थांबला. तुमच्या गळ्यात सोन्याचे दागिने असल्याने मोफत साडी मिळणार नाही, असे त्याने मोगल यांना सांगितले. त्यामुळे मोगल यांनी गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सात गॅ्रम वजनाचे कर्णफुले आणि वेल असे एकूण ६५ हजार रुपयांचे दागिने काढले. दागिने स्वतच्या ताब्यात घेत साडय़ा आणून देतो, असे सांगून संशयित दागिने घेऊन फरार झाला. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.