लासलगाव स्थानकात सोमवारी थांबणार; कांदा उत्पादकांना दिलासा
नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेली किसान रेल्वे आता आठवडय़ातून चार दिवस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारचा त्यात समावेश करण्यात आला आहे. कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव स्थानकात किसान रेल्वे सोमवारीही थांबणार असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आभासी बैठक घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना किसान रेल्वेचे आठवडय़ातील दिवस वाढविण्याची सूचना केली होती. या सूचनेची दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातून आठवडय़ातून तीन दिवस सोडण्यात येणारी किसान रेल्वे आता चार दिवस सोडण्यात येणार आहे. यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव स्थानकात सोमवारीही किसान रेल्वेला थांबा मिळाल्याने सोमवारी लासलगाव स्थानकात किसान रेल्वेचे स्वागत सभापती जगताप यांनी केले. या वेळी स्मिता कुलकर्णी, राजाभाऊ चापेकर, मुख्य पार्सल आधिकारी विजय जोशी आदी उपस्थित होते. लासलगाव येथून दानापूरला ९६ टन कांदा रवाना करण्यात आला.
किसान रेल्वे आठवडय़ातून मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस होती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळिंबांसह फळे आणि भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या लासलगाव परिसरात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षमाल पाठविण्यासाठी येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून लासलगाव परिसरातील शेतमाल किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरगावी पाठविता यावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
चार ते पाच पार्सल व्हॅनची गरज
मध्य रेल्वेच्या लासलगाव स्थानकात किसानसेवा रेल्वेची सध्या एकच पार्सल व्हॅन आहे, त्याऐवजी चार ते पाच पार्सल व्हॅनची गरज असून त्या त्वरित वाढविण्यात याव्यात, अशी मागणी सभापती जगताप यांनी केली आहे. किसान रेल्वेत लासलगावसाठी अधिकाधिक सुविधा प्राप्त होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास व्यापारी आणि शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होऊ शकेल.
