नाशिक : सुमारे सहा हजारहून अधिक काळविटांना अधिवास लाभलेल्या जिल्ह्यातील ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात नीलगाय नव्हती. चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिचे दर्शन घडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गौताळा अभयारण्य आहे. उन्हाळ्यात तेथून काही नीलगायी ६० ते ७० किलोमीटर अंतर तुडवत नाशिकच्या या वनक्षेत्रात पोहचल्या. आता त्यांची संख्या १०० वर पोहचली आहे. काळविटांसाठी प्रसिद्ध हे संवर्धन राखीव क्षेत्र आता नीलगायींसाठीही ओळखले जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला-नांदगाव या दोन तालुक्यांच्या सीमारेषेवर साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रात हे संवर्धन राखीव क्षेत्र आहे. हा परिसर हरीण, काळविटांच्या नैसर्गिक अधिवासासाठी अनुकूल ठरला. या क्षेत्रात एकही नीलगाय नव्हती. जून २०२१ मध्ये प्रथम तिचे दर्शन घडले. प्रारंभी तीन, चार नीलगायी दिसत होत्या. या ठिकाणापासून ७० किलोमीटरवर गौताळा अभयारण्य आहे. उन्हाळ्यात खाद्य, पाण्याच्या शोधात काही नीलगायी तेथून या भागात स्थलांतरित झाल्याचा वन विभागाचा निष्कर्ष आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या नीलगायी नंतर माघारी गेल्याच नाहीत. चार वर्षात नीलगायींची संख्या १०० वर पोहोचल्याचे वनरक्षक गोपाळ राठोड यांनी सांगितले. मुबलक गवत, पाणी आणि सुरक्षितता या कारणांस्तव नीलगायींनी या क्षेत्राला आपलेसे केल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे.

वर्षभर खाद्य, पाण्याची उपलब्धता

काळवीट आणि नीलगायींना ममदापूर येथे वर्षभर मुबलक पौष्टिक खाद्य उपलब्ध असते. वन विभागाची गवती बियांची येथे राज्यातील एकमेव रोपवाटिका आहे. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरात २५ पाणवठे आहेत. कुपनलिका खोदण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जेवरील पंपांनी कुपनलिकांमधून पाणवठे भरण्याची व्यवस्था केली आहे.

वन्यजीव संपदा

राज्य शासनाने २०१४ मध्ये ममदापूर, राजापूर परिसरातील साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित केले. त्यावेळी अभयारण्यात दोन ते अडीच हजारच्या आसपास काळवीट होते. १० वर्षात त्यांची संख्या दुप्पट झाली. या क्षेत्रात लांडगा, तरस, कोल्हा, खोकट, उदमांजर, ससा, मंगूस, सायाळ आणि मोरांची संख्या वाढली. यामध्ये नीलगायींचाही समावेश होऊन त्यांची संपूर्ण जीवनसाखळी येथे तयार झाली आहे.