मनमाड येथील रेल्वे उड्डाण पुलाचा काही भाग नोव्हेंबरमध्ये ढासळल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर या पुलावरून दुचाकी वाहनांसाठी वाहतूक अंशतः सुरू करण्यात आली. एक ते पाच फेब्रुवारी या कालावधीत हा पूल चारचाकी गाड्यांसह अवजड वाहनांसाठीही सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. दुचाकींसाठी पूल खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडी होऊन वादही उद्भवले. राज्य शासनाने या रेल्वे उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ नोव्हेंबर २०२३ रोजी मनमाड-इंदूर महामार्गावरील मनमाड शहराच्या रेल्वे स्थानकालगतचा उड्डाणपूल ढासळल्याच्या घटनेला ४९ दिवस उलटून गेल्याने शहरातील या दोन्ही भागांचा संपर्क तुटला आहे. वाहतुकीबरोबरच त्याचा व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक, आरोग्य विषयक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. मनमाड ते येवला दरम्यानची आर्थिक आणि व्यावसायीक उलाढाल या काळात २० टक्क्यांवर आली. तर या दोन्ही भागातील जनजीवनही विस्कळीत झाले.

हेही वाचा…महाराष्ट्रात क्रीडा विज्ञान केंद्राची लवकरच स्थापना; १२ क्रीडा प्रकारांसाठी लक्षवेध योजना

मनमाड ते येवला बस वाहतुकीवर तसेच उत्पन्नावरही यामुळे विपरीत परिणाम झाला आहे. तर धुळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या थेट वाहतुकीच्या एसटी बस या मालेगांव, नांदगावमार्गे मनमाडला न येता येवल्याकडे जातात. तर पुण्याहून धुळ्याकडे जाणाऱ्या गाड्या येवला, नांदगाव, मालेगावमार्गे धुळ्याकडे जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचा व पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.

रेल्वेने रात्रीच्या वेळी नंदीग्राम, पंचवटीसह विविध गाड्यांतून येणाऱ्या एकटे, दुकटे प्रवासी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना एकटे पाहून लुटमारीचे प्रकारही वाढले आहेत. तर या पुलाच्या परिसरात विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या दुचाकी वाहनांच्या चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे.

हेही वाचा…ठाकरे गटाची कृती लोकशाहीच्या विरोधात – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे टिकास्त्र

वाहतूक कोंडी, वाद, गोंधळ

दुचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरू होताच बेशिस्त वाहनचालकांनी एकच गर्दी केली. परिणामी पुलावर तसेच नगिना मस्जिदजवळ दोन्ही बाजूकडून वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली तर काही दुचाकी वाहन चालकांत शाब्दीक चकमकी झडल्या, हाणामारीही झाली. त्यामुळे या ठिकाणी नगरपालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर पोलिसांनी पुरेशी दक्षता घेऊन बंदोबस्त देण्यात यावा, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी फुले-शाहू आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad flyover open to two wheeler traffic of heavy vehicle starts soon psg