इगतपुरीपेक्षा सिन्नरमध्ये अधिक बांधकामांचा समावेश
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्य़ातील ४९ पैकी ३७ गावांमधील एकूण ३४७ बांधकामे बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात इगतपुरीतील १८ गावांमधील ६९, तर सिन्नरच्या १९ गावांमधील २७८ बांधकामांचा समावेश आहे. या बांधकामांचे मोजमाप व मूल्यांकनाचे काम प्रगतिपथावर आहे. एका गावात मध्यंतरी मोजमापास विरोध झाला होता. उर्वरित गावांमधील बांधकामांची माहिती देत प्रशासन हे काम शक्य तितक्या लवकर पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे.
समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासून जिल्ह्य़ात त्यास कडाडून विरोध होत आहे. त्याचे प्रतिबिंब जमीन एकत्रीकरण योजनेद्वारे (लँड पुलिंग) जमीन घेण्याची नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेल्या हरकतींमधून उमटले होते. या मार्गासाठी जमीन एकत्रीकरण योजनेद्वारे जमीन घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घडामोडी सुरू असताना प्रशासनाने शेतकऱ्यांची हरकत कायम ठेवून संयुक्त मोजणी अनेक गावांमध्ये पूर्ण केली. सिन्नरच्या शिवडेसह अन्य गावांत प्रखर विरोध झाला. या आंदोलनाला सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाठबळ मिळाले. त्यामुळे पाच गावांमध्ये अद्याप मोजणी झालेली नाही. जमीन एकत्रीकरण योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने नंतर खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील जमीन ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली. त्यासही अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींबाबतची माहिती प्रशासनाने खुली केलेली नाही. अधिकचे दर देऊन शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
समृद्धी विकास केंद्रांचा विषय तूर्तास बाजूला ठेवत प्रशासनाने महामार्गासाठीच्या जमीन संपादनावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रस्तावित महामार्गात सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील एकूण ४९ गावांतील १२०० हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. त्याकरिता गाव व गटनिहाय रेडीरेकनरचे दर आणि मागील तीन वर्षांत जमिनींच्या खरेदी-विक्रीचा अभ्यास करण्यात आला. या माध्यमातून प्रति हेक्टरी २५ लाख ते एक कोटी रुपयांहून अधिकचे दर जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत. हे दर केवळ शेतजमिनींचे राहणार असून त्यावरील घर अथवा इतर बांधकामे, विहिरी व झाडे यांच्यासाठी स्वतंत्रपणे मोबदला दिला जाईल. त्या अनुषंगाने बांधकामाच्या मूल्यांकनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे.
प्रस्तावित मार्गात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक बांधकामे असल्याचे दिसून येते. सिन्नर तालुक्यातील १९ गावांमधील २७८ बांधकामांचे मोजमाप व मूल्यांकन सुरू आहे. तर इगतपुरी तालुक्यात १८ गावांतील ६९ बांधकामांचे मूल्यांकन केले जात आहे. प्रस्तावित मार्गात गोंदे गावात सर्वाधिक म्हणजे ५१ बांधकामे आहेत, तर घोरवड, सोनांबे, मऱ्हळ बुद्रुक या गावांमधील एकही बांधकाम मार्गात बाधित होणार नाही. एकूण गावांपैकी बहुतांश ठिकाणी मोजमाप पूर्ण झाले असून उर्वरित गावांमध्ये काम प्रगतीत आहे.
गावनिहाय बांधकामे
सिन्नर तालुका – गोंदे ५१, खंबाळे ४८, आगासखिंड ४७, वावी २८, फुलेनगर १७, पाटोळे २२, सायाळे, मलठोण, कोनांबे प्रत्येकी २, द्वशिंगवाडी १, मऱ्हळ (खुर्द) ८, पांढुर्ली ५, सोनारी १७ बांधकामे आहेत. सिन्नर तालुक्यातील सोनांबे, धोरवड, मऱ्हळ (बुद्रुक) या गावांमधील एकही बांधकाम बाधित होणार नाही. इगतपुरी तालुक्यात १८ गावांमधील ६९ बांधकामे बाधित होणार आहेत. त्यात तारांगण पाडा, कांचनगाव, शेनवड (बु), तळोघ, पिंपळगाव घाडगा, पिंप्री सदो प्रत्येकी १, अवचितवाडी ९, तळोशी ५, खडकवाडी व खैरगाव प्रत्येकी ४, उभाडे, बेळगाव तऱ्हाळे व पिंपळगांव मोर प्रत्येकी ३, धामणी १४, तताळेवाडी १२, गंभीरवाडी, भरवीर खुर्द व कवडदरा प्रत्येकी २ अशी बांधकामे बाधित होतील. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील १२ गावांमधील बांधकामांचे मोजमाप व संख्या यांची स्पष्टता अद्याप झालेली नाही.