नंदुरबार – जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, जनसुविधा, सिंचन आणि बांधकामाचे प्रश्न ऐरणीवर असतांनाच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाकंडून कोट्यवधीचा निधी खर्च न होताच व्ययगत झाल्याची गंभीर बाब समोर आल्याने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यंत्रणेवर आगपाखड केली.

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री कोकाटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या गैर कारभाराची प्रचिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेला प्राप्त निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असतांना अनेक विभागाकडे महत्वाच्या कामांसाठीचा लाखो रुपयांचा २०२३-२४ मधील अखर्चित निधी वापराविना व्ययगत झाला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यंत्रणांवर  चांगलेच चिडल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात स्मशानभूमी, रस्ते सारख्या पायाभूत सुविधांचा वाणवा असतानाच ग्रामपंचायत विभागाचा जनसुविधेचा ६१.६६ लाखांचा निधी व्ययगत झाला आहे. सर्वाधिक वाईट परिस्थिती ही शिक्षण विभागाची असून आज नंदुरबारमधील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ४६ शाळांना इमारत नसल्याने त्या खासगी घरात सुरु आहे. अशातच स्वत मंत्री कोकाटे हे सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ५८ शाळांची बांधणी करत आहे. अशातच शिक्षण विभागाचा शाळा वर्ग खोली दुरुस्तीचा ७५.८ लाखांचा आणि शिष्यवृत्तीचा एक कोटी १४ लाखांचा निधी व्ययगत झाला आहे.

जिल्ह्यात सिंचनाची परिस्थिती जेमतेम असतानाच बंधारे बांधण्यासह विविध कामांचे ९७ लाख ४१  हजारांचा निधी व्ययगत झाला आहे. समाज कल्याण विभागाचा दलित वस्ती सुधारणा कार्यक्रमाचा ३१.६४ लाख, महिला बाल कल्याण विभागाचा प्रशिक्षण व वस्तू खरेदीचा २६ लाखांचा तर बांधकाम विभागाचा ३२.९७ लाखांचा निधी वापराविना परत गेला आहे. यात पशुसंवर्धन विभागही मागे नसून वैरण व पशुखाद्य विकासाचा ३९.२२ लाखांचा निधी हा वापराविनाच परत गेला.

केवळ जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ वर्षातील व्ययगत निधीचा आकडा पाहता सर्व विभाग मिळून पाच कोटी २७ लाखांचा निधी हा व्ययगत झाला आहे. यातील अनेक कामे अपूर्ण असल्याने नव्या वर्षात या कामांसाठी पुन्हा निधी मागणी करावी लागणार असल्याने हे शासनाचे दुहेरी नुकसान असल्याने याबाबत  पालकमंत्री कोकाटे यांनी जिल्हा परिषदच्या यंत्रणेंना तंबी दिली आहे. पालकमंत्री कोकाटे यांच्या या जमदग्नी अवताराचा यंत्रणेवर काही फरक पडतो, जिल्हा परिषदेच्या कारभारात काही सुधारणा होते का, याची उत्सुकता आता आदिवासी बांधवांना लागून आहे.