नाशिक – वैद्यकीय व्यवसायात अडचणी निर्माण करण्याची धमकी देत अनधिकृत वृत्तवाहिनीवर खोटी माहिती देत तोतया पत्रकारांनी डॉक्टर दाम्पत्याकडे पाच लाखाची खंडणी मागून यापैकी ५० हजार रुपये वसूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत डॉ. अंजली धादवड यांनी तक्रार दिली. डॉ. धादवड या स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांचे कालिका मंदिर परिसरात ब्लॉस्मस नावाचे रुग्णालय आहे. धादवड यांचे अपंग पतीही डॉक्टर आ्हेत. ते सिन्नर येथे व्यवसाय सांभाळतात. मनोहर पाटील आणि योगेश पाटील अशी संशयित खंडणीखोरांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सिन्नर येथील सखूबाई शिंदे या रुग्णाच्या तक्रार अर्जाच्या संदर्भात चौकशी करुन संशयितांनी डॉक्टर दाम्पत्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. संशयित कोणत्याही नोंदणीकृत वृत्तसंस्थेचे वार्ताहर नसताना स्वत:ला एम. जी. न्यूज चॅनेलचे वार्ताहर असल्याचा दावा केला.
खोटी, बनावट माहिती देत आमच्या वैद्यकीय व्यवसायाची बदनामी केली. नंतर पतीकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. यातील खंडणीची ५० हजाराची रक्कम हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रुग्णालयातील कर्मचारी सागर भांगरे याच्याकरवी आमच्याकडून स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणी, ॲट्रोसिटी आणि दिव्यांग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवत दोन संशयितांनी एका व्यावसायिकाची २२ लाख रुपयांना फसवणूक केली. याबाबत पंकज सानप (रा,गोविंदनगर) या व्यावसायिकाने तक्रार दिली. राहुल साळुंखे आणि नीलेश जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सानप आणि संशयित परस्परांचे परिचित आहेत.
फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयितांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दिली होती. सानप यांच्या घरी जाऊन शेअर बाजाराचे महत्व पटवून दिले. यामुळे त्यांचा विश्वास बसला. या काळात त्यांनी वेळोवेळी २१ लाख ९० हजाराची रक्कम संशयितांच्या स्वाधीन केली. दोन वर्ष उलटूनही गुंतवणुकीसह मोबदला पदरात न पडल्याने सानप यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सानप यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीत नऊ लाखाचा ऐवज लंपास
शहरात घरफोडीचे सत्र सुरू असून अशोकनगर भागात झालेल्या घटनेत चोरट्यांनी सुमारे नऊ लाखाचा ऐवज लंपास केला. याबाबत चंद्रशेखर वैष्णव (राज्य कर्मचारी सोसायटी, अशोकनगर) यांनी तक्रार दिली. १५ मे ते २९ जून या कालावधीत ही घटना घडली. चोरट्यांनी वैष्णव यांच्या घरात शिरून डब्यात ठेवलेले सुमारे आठ लाख ९६ हजार रुपयांचे दागिने चोरले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.