मालेगाव : सेवाजेष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना १३ वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची दोन कोटी ६९ लाख ५६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांना नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच येथील या. ना. जाधव विद्यालयातील भरती घोटाळ्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याला देखील अटक झाली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जैनब मोहम्मद या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जैनब व सिमा तरन्नुम निहाल अहमद या दोन्ही शिक्षिका २०१३ पासून मालेगाव हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत होत्या. या दोन्ही शिक्षिकांना २०२३ मध्ये २० टक्के अनुदान तत्वावर घेण्यात आले. त्यानंतर याच शाळेत जून २०२४ मध्ये नोकरीस लागलेले अन्य १३ शिक्षक सन २०१२ ते २०२१ या काळात या शाळेत सेवेत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण अधिकाऱ्यांकडे संच मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यानुसार प्रस्ताव मंजूर झाल्याने या १३ शिक्षकांना १०० टक्के अनुदान लागू झाले. या शिक्षकांच्या मागील तारखेपासून दाखविण्यात आलेल्या सेवेमुळे थकीत वेतनापोटी दोन कोटी ६९ लाख ५६ हजार १९४ रुपये पदरात पाडून घेतले, त्यामुळे शासनाची व आम्हा दोघा शिक्षकांची फसवणूक झाली आहे, असे जैनब मोहम्मद यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अंजुमन मोईनु तुलबा संस्थेचा चालक मोहम्मद इसाक खलील अहमद, शाळेचे प्राचार्य जाहिद हुसेन, लिपिक नासिर हुसेन, वरिष्ठ लिपिक अबू हुरेरा व महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील शिक्षक नवीद अख्तर आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील नवीन अख्तर याने या प्रकरणात दलालाची भूमिका निभावल्याचा संशय आहे. त्याच्या विरोधात अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे अन्य गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याला सेवेतून निलंबित केले आहे. या प्रकरणी वर नमूद केलेले पाचही संशयित फरार असून अन्य पाच शिक्षकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सेवाजेष्ठता डावलून १३ शिक्षकांना मान्यता आणि वेतन अदा केल्याच्या फसवणूक प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मंगळवारी रात्री दोघांना अटक केली.
काही दिवसांपूर्वी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासंदर्भात संस्थाचालक व अन्य तीन जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही संशयित फरार आहेत. या प्रकरणात कर्मचारी भरतीला मान्यता देताना जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री त्याला अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात एकाच रात्री नाशिक जिल्ह्यातील दोन बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला अटक झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, उपअधीक्षक जे.एम.करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आर.एस.सुर्वे हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.