नाशिक : आगामी सि्ंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघात वर्चस्वावरून तीर्थ पुरोहितांचे दोन गट पडले आहेत. संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून रविवारी रात्री सतीश शुक्ल आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या गटातील बाचाबाचीचे वादात रुपांतर झाले होते. या संदर्भात दोन्ही गटांनी आता परस्परांविरोधात तक्रारी देऊन कारवाईची मागणी केली आहे.
पुरोहित संघावरील वर्चस्वावरून सतीश शुक्ल आणि चंद्रशेखर पंचाक्षरी गटातील संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही गटांनी अध्यक्षपदावर दावा सांगत परस्परांना आपल्या कार्यकारिणीतून वगळले. दोन्ही गटांकडून आपलीच कार्यकारिणी म्हणजे पुरोहित संघ असल्याचा दावा केला जात आहे. नव्या कार्यकारिणीचा फलक लावण्यावरून रविवारी रात्री या गटात वाद झाले होते. एका गटाने रविवारी रात्री कार्यकारिणी फलक लावण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. यामुळे दोन्ही बाजुचे पदाधिकारी आणि सदस्य समोरासमोर आले. बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला होता.
या संदर्भात दोन्ही गटांनी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिल्या आहेत. सतीश शुक्ल यांच्या तक्रारीनुसार रामकुंड परिसरात सामूहिक गुंड टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न होत आहे. चंद्रशेखऱ् पंचाक्षरी यांच्यासह २९ जणांनी आमच्या स्थानावर येऊन चाल करून आले. शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. वंश परंपरेने असलेले बैठक स्थानी येऊन अनधिकृतपणे फलक लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामात नित्य अडथळा आणणे, धमक्या देण्याचे प्रकार घडत असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शुक्ल यांनी दिला आहे.
तर चंद्रशेखर पंचाक्षरी यांनीही सतीश शुक्ल व प्रतिक शुक्ल यांच्याविरुद्ध तक्रार दिली. उभयतांनी बेकायदेशीर कार्यकारिणी घोषित करून रविवारी रात्री फलक लावण्यास मज्जाव केला असता त्यांनी संस्था अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. संस्था कार्यालयापासून हाकलून मारण्याची धमकी दिली. शुक्ल पिता-पुत्राकडून संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सतीश शुक्ल यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने पुरोहित संघाची मोठी बदनामी होत असल्याकडे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी लक्ष वेधले आहे.