नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणावर आधी आडगावच्या मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात उपचार झाल्याचे सांगितले जाते. नंतर त्याचा मेंदूमृत अर्थात ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगून घरी नेण्यास सांगण्यात आले. आदिवासी भागातील कुटुंबियांना त्याचा अर्थ उमगला नाही. त्याचा मृत्यू झाल्याचे समजून अंत्यविधीची तयारी करण्यात आली. त्याच सुमारास खोकला येऊन त्याची हालचाल झाल्याने तो जिवंत असल्याचे पाहून कुटुंबियांनी त्याला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

भाऊ लचके असे या १९ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुचाकी घसरून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नसल्याने त्याला मविप्र संस्थेच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नातेवाईक त्याला शहरातील अन्य खासगी रुग्णालयात घेऊन गेल्याचे वसंत पवार रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या घटनाक्रमात नंतर मेंदूमृत निदान होऊन त्याला घरी नेण्यास सांगण्यात आले. मेंदूमृतचा अर्थ नातेवाईकांना नीटसा कळला नाही. त्यामुळे गोंधळ झाल्याचे सांगितले जाते. आदिवासी पाड्यात नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. दरम्यानच्या काळात खोकला येऊन रुग्णाची हालचाल झाल्याने तो जिवंत असल्याचे लक्षात आले. मग त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. डोक्याला फटका बसल्याने त्याच्यावर उपचार केले जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी सांगितले. हा रुग्ण जेव्हा दाखल झाला, तेव्हा त्याच्यावरील उपचाराचे पत्रक (डिसार्ज कार्ड) आधीच्या रुग्णालयाकडून दिले गेलेले नव्हते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाले. या स्थितीत रुग्णावर शस्त्रक्रिया करणे कठीण असते. त्याची स्थिती पाहून नंतर मेंदूविकारतज्ज्ञ निर्णय घेतील. प्रारंभी जिल्हा शासकीय रुग्णालायत व्हेंटिलेटरची खाट संबंधितास मिळाली नव्हती. यामागे १५ तालुक्यांमधून मोठ्या संख्येने दाखल होणारे रुग्ण आणि व्हेंटीलेटरच्या खाटांची मर्यादित संख्या हे कारण असण्याची शक्यता डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. आदिवासी भागातील गरीब कुटुंबिय व नातेवाईकांना रुग्णाच्या स्थितीबाबत योग्य प्रकारे मार्गदर्शन न झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली जाते.